बुलडाणा: राज्यासह देशात मशिदीच्या भोंग्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अजान विरुद्ध हनुमा चालीसा असा वाद पाहायला मिळत आहे. यातच बुलडाणा जिल्ह्यातील केळवद येथील हिंदू बांधवांनी भाईचाऱ्याचा संदेश दिल्याचे दिसत आहे. केळवदमधील हिंदूंनी मुस्लिमांना ईदच्या पवित्र दिवशी भोंगा भेट देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडवले. गावात मशीद नाही, मात्र शेजारील किन्होळा येथील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छांसह भोंगा भेट दिला.
एकीकडे मनसेकडून राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टीमेटम दिला जातोय, तर दुसरीकडे केळवद गावच्या मशिदीला भोंगाच नाही हे लक्षात आल्यानंतर गावच्या हिंदू बांधवांनी आपसात एकजूट दाखवत भोंगा विकत घेऊन तो मशिदीला दिला. ईद उल फित्रच्या दिवशी हिंदू बांधवांनी भोंग्याची अनोखी भेट दिल्याने मुस्लिम बांधव भारावून गेले.
केळवदला पुरोगामी विचारांचे गाव म्हणून ओळखले जाते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी याच भूमीमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. इंग्रजांविरोधातील चळवळ या गावातून पुढे चालली होती. आता राज ठाकरे भोंगे काढण्याचे सांगतात, परंतु गावातील लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे यातून दिसून आले. केळवदची लोकसंख्या पाच हजार असून, मुस्लिम बांधवांची संख्या अवघी दीडशे आहे. गावात सर्वधर्मियांत गुण्यागोविंदाचे वातावरण आहे. यातच केळवदच्या ग्रामस्थांनी भेट दिलेला भोंगा हा शांती व सलोख्याची भेट आहे.