बुलढाणा : चित्यांचे पुनर्वसन हे गेल्या ७० वर्षापूर्वी पर्यावरणीयदृष्ट्या झालेल्या घोड चुकीची दुरुस्ती करून पर्यावरण संतुलन राखण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. थोडक्यात इकॉलॉजिकल राँगला इकॉलॉजिकल हार्मनीने जोडण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला गेला असल्याचे केंद्रीय कामगार, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भुपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे स्पष्ट केले. बुलढाणा येथे भाजपच्या बुथ ते प्रदेश पातळीपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या भूमिकेतून ते बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून आहेत.
सोमवारी त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना उपरोक्त भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. डॉ. संजय कुटे, माजी आ. चैनसुख संचेती, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपने दाऊदला परत आणण्याची वल्गना केली होती. परंतु दाऊदला न आणता भारतात चित्ते आणले जात आहेत, या विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उपरोक्त उत्तर दिले.
दरम्यान, देशात ५२ टायगर रिझर्व असून या टायगर रिझर्वमधूनच देशातील २५० पेक्षा अधिक नद्यांची उगमस्थाने आहेत. नर्मदा, महानदी, कृष्णा, गोदावरीसारख्या नद्या या पट्ट्यातूनच वाहतात. पाणी हे मानवी जिवनाचा अविभाज्य भाग आहे आणि अशा नद्यांच्या काठीच मानवी सभ्यता विकसीत झाल्या. मानवी विकासासोबतच पर्यावरणीय विकास अर्थात शाश्वत विकास तितकाच महत्त्वाचा आहे. देशात आज ३५ हजार पेक्षा अधिक जैवविविधेता असलेल्या वनस्पती या जंगलामुळे सुरक्षित आहे.
तसेच निसर्गाचे मॅकेनिझम विकसित करण्यासोबतच चित्यासारखे हिंस्त्रप्राणी (प्रेडीटर) त्यात संतुलन राखण्यास मदत करतात. वन्यजीव, जैवविविधता पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे मोठे पाऊल उचलले. आफ्रिका खंडातून भारतात आणलेल्या चित्त्यांच्या पुनर्वसनाच्या उपक्रमाचे वैश्विकस्तरावर स्वागत होत आहे. ही एक मोठी उपलब्धी असून ७० वर्षापूर्वी झालेल्या इकोलॉजिकल राँगला आता इकोलॉजिकल हारमनीमध्ये परावर्तीत करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. त्यामुळे अशा गंभीर विषय दुसऱ्या विषयाची जोडणे संयुक्तीक नसल्याचे यादव म्हणाले.
ठाकरे सरकारच्या काळात विकास कमीठाकरे सरकारच्या काळात विकास कमी झाला. त्यांची अडीच वर्षे ही त्यांचे सरकार वाचवण्यातच गेली. परंतु शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विकासाचा वेग वाढला असून बुलढाण्यासारख्या जिल्ह्यात त्याची मेडीकल कॉलेज, जिगाव प्रकल्पासह आगामी काळात जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालणा देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलली जात असल्याचे ते म्हणाले.