बुलडाणा - राज्यात शिवसेनेत मोठा बंड झाल्यानंतर शिंदे गटाने ५० आमदारांसह सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे कमी संख्याबळ असताना शिंदे गटाचे प्रमुख आणि सध्याच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदही मिळाले. त्यानंतर, शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, काही दिवसांपूर्वीच शिवसेनाखासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे, शिंदे गटाची ताकद आणखी वाढली असून आता खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी मोठा दावा केला आहे. त्यानुसार, ८ आमदार आणि ३ खासदार शिंदे गटात येणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार 100 टक्के शिंदे गटात येतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे. याअगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. मात्र, आता पुन्हा एकदा खा. जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल असा दावा खासदार जाधव यांनी केला असून 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जाधव यांच्या या विधानामुळे आता ते ८ आमदार आणि ३ खासदार कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, ठाकरे गटातही या गौप्यस्फोटानंतर चाचपणी करण्यात येऊ शकते. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यादिवशीही ३ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी, एकाही खासदाराने किंवा आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला नाही. त्यामुळे, प्रतापराव जाधव यांनी केलेला दावा कितपत खरा ठरणार हेही वेळ आल्यावरच दिसणार आहे.