विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये बाजारपेठा सजल्या आहेत. हा सण जस जसा जवळ येत आहे , तसतशी घरांमध्ये लगबग वाढली आहे. घराची साफसफाई, दिवाळीचा फराळ तसेच घराच्या सजावटीसाठी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांमध्ये झुंबड उडल्याचं दिसतयं. ही कामे सध्या जोरात सुरू आहेत. बाजारपेठांमध्ये कपडे, आकर्षक गिफ्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रंगीबेरंगी कंदील, दिवे खरेदीसाठी बाजारामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.यैा पार्श्भूमीवर बिहारमध्ये राहणारे व्यावसायिक दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, मापले गुजरातमधून खरेदी करून खामगाव शहरात विक्री करीत आहेत. शहरात मुख्य रस्त्यालगत तसेच ठिकठिकाणी पणत्या, मापलांसह विविध साहित्य विक्रीची दुकाने लागली आहेत.
दिवाळीच्या सणाची चाहुल लागताच मोठ्या दुकानांसह शहरातील प्रत्येक रस्त्यालगत विविध साहित्य विक्रीची छोटी मोठी दुकाने लागली आहेत. शहरातील पोलिस स्टेशन, बस स्थानक ते जलंब नाक्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत तसेच घाटपुरी, वाडी रोड, सुटाळा रोड, शेगाव रोडवर अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे खामगाव शहरातील व्यावसायिकांसोबतच परराज्यातील व्यावसायिक सुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात दाखल झाले आहेत.
राज्याच्या विविध भागातून प्रामुख्याने बिहार, इंदौर येथून अनेकजण दिवाळीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी खामगावात दाखल झाले आहेत. पोलिस स्टेशनसमोर दुकाने थाटणारे दुकानदार बिहारमधील रहिवासी आहेत. ते दरवर्षी गुजरातमधून विविध डिझाइनच्या आकर्षक पणत्या, डिझाइन असलेली मापलं, तुळशी वृंदावण, मातीचे आकर्षण ठरणारे आकाशदिवे, घरात सजावटीसाठी लागणाऱ्या माती व टेराकोटच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या वस्तूंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, एक महिन्यानंतर परत आपल्या गावी जाणार असल्याचे व्यावसायिक विक्कीकुमार यांनी सांगितले. यासोबतच इंदूरवरून आकर्षक लाइट व सजावटीच्या वस्तू विक्री करणारे अनेक व्यावसायिक खामगावात आले आहेत. इंदौरमध्ये इलेक्ट्रीकचे साहित्य मोठ्या प्रमाणात मिळते. या साहित्याची देखील विक्री खामगाव करण्यात येत आहेत. यासोबतच मातीचे तवे, मडके, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मातीच्या वस्तू विक्री करण्यासाठीही परराज्यातील व्यावसायिक मागे नाहीत.
लहान मुले सुद्धा करतात विक्री
खामगावमध्ये रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये लहान मुले सुद्धा साहित्याची विक्री करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या या सणांमध्ये एक महिन्यासाठी हे व्यवसायिक खामगावात मुक्काम करतात. त्यानंतर दिवाळी झाल्यावर ते परत आपल्या मूळगावी परततात.
मुख्य दुकान नाशिकमध्ये
या बिहारमधील व्यावसायिकांचे मुख्य दुकान नाशिकच्या मालेगावमध्ये आहे. मालेगावमध्ये त्यांची कायमस्वरूपी दुकानं आहेत. तेथून संपूर्ण राज्यात विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी पाठविण्यात येते.असं व्यवसायिक विक्की कुमार यांच्याकडून सांगण्यात येत आहे.