चिखली (बुलडाणा): भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली. बुलडाण्यातील चिखली मेहकर फाट्या जवळील एमआयडीसीजवळ २० जुलैला हा दु्र्दैवी अपघात झाला. अनिल दामोदर गवई (रा. खैरव) असे मृताचे नाव आहे. दवाखान्याच्या कामासाठी अनिल हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तिला दुखापत झाली.
खैरव येथून चिखलीला दवाखान्याच्या कामानिमित्त अनिल दामोदर गवई व भिवाजी उकर्डा गवई हे दोघे जण जात होते. त्यांची दुचाकी क्रमांक एमएच २८ एससी १९३५ ने त्यांचा प्रवास सुरू होता. चिखलीत आपले काम वेळेत आटपून ते दोघे घरी ५ - साडे पाचच्या सुमारास पुन्हा खैरव येथे निघाले. त्याच वेळी परत जात असताना, एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेलपासून काही अंतरावर मेहकर कडून येणाऱ्या कंटेनरने (एमएच ४० बीएल ७४८०) दुचाकीला जबर धडक दिली.
कंटेनरसारख्या मोठ्या वाहनाने दुचाकीला दिलेली ही धडक एवढी भीषण होती की मोठा अपघात घडला. दुचाकीवर स्वार असणाऱ्या दोघांनाही कंटेनरने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यामध्ये अनिल गवई यांचा जागीच मृत्यू झाला. भिवाजी गवई हे गंभीर जखमी झाले. भिवाजी यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तसेच, मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ज्या कंटेनरने अपघात झाला तो कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.