विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदुरा-खामगाव जि. बुलढाणा: तालुक्यातील ग्राम चांदुर बिस्वा ते हिंगणे गव्हाड रस्त्यावर एका विना नंबरच्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली.
या अपघाताबाबत चांदुर बिस्वा येथील रहिवासी मृतकाचा चुलत भाऊ मोहम्मद मुस्ताक अब्दुल सत्तार यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार चांदूर बिस्वा ते हिंगणे गव्हाड रस्त्यावर विकास शास्त्री यांच्या शेताजवळ आरोपी टिप्पर चालक पवन श्रीकृष्ण भोंडेकर (वय ३३) रा. वडनेर भोलजी याने आपल्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून शेख अमिन शेख कलीम याच्या दुचाकीला धडक दिली.
यामध्ये शेख अमिन शेख कलीम यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात एमएच २८, बीटी ५६८४ मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पवन श्रीकृष्ण भोंडेकर विरुद्ध २७९,३३८ ३०४ सह कलम १३४, १८४, १८५, १४६, १९६ मोटर वाहन कायदा कलमाखाली गुन्हा दाखल केला.पुढील चौक तपास अंमलदार खोंदील करीत आहेत.