सदानंद सिरसाट : खामगाव, जि. बुलढाणा: गेल्या काही दिवसांत परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी झाल्याने याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गुरुवारी दुपारी दुचाकी चाेरणाऱ्या नागपूर येथील व खामगावातील बर्डे प्लाँटमधील एकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून ११ दुचाकी जप्त केल्याची माहिती आहे. याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
खामगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. सातत्याने दुचाक्यांची चोरी होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही बाब पोलिसांनी गांभीर्याने घेत दुचाकी चोरी करणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील, शिवाजी नगरचे ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनात गोपनीय शाखेचे उपनिरीक्षक विनोद खांबलकर यांनी नागपुरातून एकाला ताब्यात घेतले. तसेच खामगाव बर्डे प्लॉट भागातील एकास ताब्यात घेत चौकशी केली. त्यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. त्यानुसार चोरीच्या दुचाकी जप्त करण्याची कारवाई सुरू केली.
गुरुवारी दुपारपर्यंत ११ दुचाकी जप्त केल्याची माहिती आहे. पोलिसांची ही कारवाई सुरूच असून आणखी दुचाकी जप्त केल्या जाणार आहेत. तसेच दुचाकी चोरांचे रॅकेटही उघडकीस येण्याची शक्यता आहे.