- अनिल गवई
खामगाव: शासकीय रूग्णालयाचा अपवाद वगळता शहरातील खासगी दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल वेस्ट’ भंगारात किंवा उघड्यावर फेकून दिल्या जात आहे. त्यामुळे शहरातील ‘बायोमेडिकल वेस्ट’चा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर स्वरुप धारण करित असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय आणि खासगी दवाखान्यांमधून दैनंदिन बाहेर पडणारा ‘जैववैद्यकीय कचरा’ (बायोमेडिकल वेस्ट) उचलून नेण्याकरिता अमरावती येथील ‘मे. ग्लोबल इको सेव सिस्टीम’ या खासगी कंपनीला नगर पालिकेने कंत्राट दिला आहे. मात्र, केवळ शासकीय आणि काही मोठया खासगी दवाखान्यांनीच कंपनीशी करार केला असून, इतर अनेक दवाखान्यांनी या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा केल्याची वस्तूस्थिती आहे. खामगाव शहरात मोठया स्वरुपातील १५ आणि लहान स्वरुपातील सुमारे ३० असे ५० च्या आसपास दवाखाने कार्यान्वित आहेत. या तुलनेत मात्र दोन दिवसआड जैव वैद्यकीय कचरा उचलायला येणाºया ‘ग्लोबल इको सेव सिस्टीम’शी मोजक्याच दवाखान्यांनी करार केला असून बहुतांशी दवाखान्यांनी यासंदर्भात कमालीचवी उदासिनता बाळगल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. जैव वैद्यकीय कचºयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करित असून शासनाच्या आरोग्य विभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष पुरवून प्रत्येक जिल्ह्यात जैव वैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे
मोठ्या प्रमाणात जमा होतो कचरा!
दवाखान्यांमधून दैनंदिन शेकडो क्विंटल जैव वैद्यकीय कचरा बाहेर पडतो. त्यात रिकाम्या झालेल्या सलाईन्सच्या बॉटल्स, इंजेक्शन्स, शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणारे साहित्य यासह इतरही मानवी आणि पशूप्राण्यांच्या आरोग्यास घातक ठरु पाहणाºया कचºयाचा समावेश आहे.
असे आहेत जैविक कचरा व्यवस्थापनाचे दर!
जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमात सन २000 मध्ये झालेल्या सुधारणेच्या अनुषंगाने हा कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात नगर परिषदांनी संबंधित एजन्सीसोबत २0१४ मध्ये पुढील ३0 वषार्चा करार केला आहे. त्यानुसार, १ ते ४ खाटांची क्षमता असणाºया दवाखान्यांकरिता ४६७.५0 रुपये प्रतिमहा, ५ व त्यापेक्षा अधिक खाटांच्या रुग्णालयांकरिता ४.९५ रुपये प्रति खाट प्रतिदिन, पॅथॉलॉजी पदवीधारक व्यावसायिकांसाठी ६६0 रुपये प्रतिमहा, दंत वैद्यकीय व्यावसायिक ३८५ रुपये प्रतिमहा, गुरांचे दवाखाने ८६५ रुपये प्रतिमहा, क्लिनिक व डिस्पेन्सरी, डीएमएलटी, खासगी वैद्यकीय दवाखान्यांसाठी २७५ रुपये प्रतिमहा याप्रमाणे शुल्क आकारल्या जातो.
जैविक कचऱ्याचे वर्गीकरण
- पिवळा-गट
शरिरातील अवयवांच्या भागांचा यात समावेश होतो. शस्त्रक्रियेनंतर काढलेले अवयव, तुकडे, अपरा, मृत मुल, अपेडीक्स, नाळ, गर्भ पिशवी आदींचा शरिराच्या भागांचा यामध्ये समावेश आहे.
- निळा-गट
या गटात प्रामुख्याने प्लास्टीक व रबरी टाकावू वस्तूंचा समावेश आहे. यात आय.व्ही.सेट, कॅथेटर, प्लॉस्टीक, सिरींज, राईल्स ट्युब, हात मोजे या वस्तू येतात.
- पाढंरा/काळा गट
या गटात तीक्ष्ण वस्तूंमध्ये इंजेक्शनच्या सूया, पत्त्या, काचेची पट्टी, इंजेक्शनच्या कुप्या यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे दवाखान्यातील कचरा, फळांच्या साली, नारळाच्या कवट्या, झाडझुडीचा कचरा या गटात मोडतो.
शहरातील जैविक कचºयाच्या निर्मूलनासाठी अमरावती येथील ग्लोबल इको सेल या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे. कचरा उचलण्याचे निकष आणि दर या एजन्सीला ठरवून देण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या कर्मचाºयांनी जैविक कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नच नाही.
- अनंत निळे, स्वच्छता निरिक्षक, नगर परिषद, खामगाव.