बुलढाणा : पक्षी सप्ताहाला ५ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात चिमुकल्यांनी बनविलेली कृत्रिम घरटी लावून वन्यजीव सोयरेंनी अनोखा पक्षी सप्ताह साजरा केला.
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासनाकडून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. नोव्हेंबर हा महिना पक्ष्यांच्या स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्यामुळे ५ नोहेंबर ते १२ नोहेंबर या पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजामुळे शहरातून आणि गावातून ज्ञानगंगा अभयारण्याकडे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा विचार करून वन्यजीव सोयरे, बुलढाणा यांनी मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी ज्ञानगंगा अभयारण्यातील बोरखेड रस्त्याने जाताना लागणाऱ्या तोफखाना बीटमधील सोलर मचानजवळ पक्ष्यांसाठी मातीची घरटी लावली.
ही कृत्रिम घरटी वन्यजीव सोयरे यांनी नैसर्गिक रूप देण्यासाठी झाडांच्या पानांचा वापर करून छोटे वन्यजीव सोयरे आर्या नितीन श्रीवास्तव, नैतिक नितीन श्रीवास्तव आणि श्रीराज कुलकर्णी यांनी बनविली. यावर्षी दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजामुळे शहरातून आणि गावातून ज्ञानगंगा अभयारण्याकडे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा विचार करून तसेच ज्ञानगंगा अभयारण्य पक्ष्यांनी बहरलेले आहे. या ज्ञानगंगा अभयारण्यात वेगवेगळ्या ठिकाणांवरून पक्ष्यांचे आगमन झाले आहे. सर्व पक्ष्यांचे घरटे निर्माण व्हावे, म्हणून एक छोटासा उपक्रम मातीचे घरटे बांधून पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. या मोहिमेत वन्यजीव सोयरे पार्थ अतुल बडगुजर, वन्यजीव सोयरे मार्गदर्शिका प्रा. डॉ. वंदना काकडे, नितीन श्रीवास्तव आणि सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी अतुल बडगुजर यांनी श्रमदान केले.
चिमुकल्यांनी बनविलेली कृत्रिम घरटी बांधून वन्यजीव सोयरेंकडून वेगळ्या पद्धतीने पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे. पशु- पक्षांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. दरवर्षी पक्षी सप्ताहानिमित्त वन्यजीव सोयरे, बुलढाणाकडून कृत्रिम घरटी लावण्यात येतील.- नितीन श्रीवास्तव, वन्यजीव सोयरे