लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्याचा जन्मदर दीड टक्क्याने घसरला आहे. त्यातच कोरोना संसर्गाच्या काळात लग्न समारंभांचीही संख्या घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे एक प्रकारे बुलडाणा जिल्ह्यात कोराेना महामारीमुळे पाळणा लांबल्याचे चित्र आहे. गेल्या १४ महिन्यांत लॉकडाऊन, कठोर निर्बंध यामुळे लग्न समारंभाच्या कार्यक्रमांवरही बंधने आली आहेत. जे काही समारंभ होत आहेत तेही थोडक्यात आटोपण्यात येत आहेत. अवघ्या २५ जणांनाच लग्न समारंभात उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. त्यामुळे लग्न समारंभांनाही ब्रेक लागलेला आहे. गेल्या वर्षी तर संपूर्ण लॉकडाऊनचा अनुभव सर्वांनी घेतला होता. त्यावेळी तर वेळेवर लग्न समारंभ पुढे ढकलावे लागले होते. यंदाही लग्न समारंभ होत असले तरी ते मर्यादित स्वरूपात होत आहेत. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षामध्ये ४१ हजार ७९० मुले-मुली जिल्ह्यात जन्माला आली, तर २०२०-२१ मध्ये ३७ हजार ९४३ मुले-मुली जन्माला आली आहेत. गेल्या वर्षी जन्मदर हा १४.४७ टक्के होता. तो २०२०-२१ मध्ये १२.९८ आहे.
जन्मदर घटलाबुलडाणा जिल्ह्याचा जन्मदर २०१९-२० च्या तुलनेत दीड टक्क्याने घसरला आहे. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्याही २९ लाख २२ हजार ७३ वर पोहोचली आहे; अन्यथा ३० लाखांच्या आसपास जिल्ह्याची लोकसंख्या गेली असती. गेल्या वर्षी जिल्ह्याची लोकसंख्या ही २८ लाख ८६ हजार ८० होती. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्याचा जन्मदर दीड टक्क्याने घसरला आहे. २०१९-२० मध्ये जिल्ह्याचा जन्मदर १४.४७ टक्के होता तो २०२०-२१ मध्ये १२.९८ टक्के झाला आहे.