- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक उपजिल्हा रूग्णालयातील गलथान कारभाराने कळस गाठला आहे. बाळाच्या जन्म नोंदणीत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, गत वर्षांत तब्बल ७ पेक्षा जास्त बालकांचे ‘लिंग’ बदलण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. याप्रकारामुळे पालकांना संबंधित बाळाचे जन्मप्रमाण मिळविताना चांगलेच हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे समोर येत आहे.उप जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, आता उपचारानंतर देखील रूग्णांच्या नातेवाईकांचा सामान्य रूग्णालय व्यवस्थापन ‘पिच्छा’ सोडत नसल्याचे एकापेक्षा जास्त धक्कादायब प्रकार उघडकीस येत आहेत. गत दोन वर्षांत सामान्य रूग्णालयात जन्मलेल्या तब्बल ७ पेक्षा जास्त बालकांच्या जन्म नोंदणीत सामान्य रूग्णालयात ‘घोळ’ झाल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. यामध्ये ३० डिसेंबर २०१७ रोजी सामान्य रूग्णालयात टेंभूर्णा येथील एका महिलेने मुलास जन्म दिला. मात्र, या बाळाचा जन्म नोंदणी अहवाल सादर करताना सामान्य रूग्णालय प्रशासनाचे चक्क बालिका म्हणून नोंद घेतली. हीच नोंद पालिकेत सादर केली. तर ०८ नोव्हेंबर २०१८ रोजी नांदुरा तालुक्यातील हिंगणा भोटा येथील एका महिलेने बालिकेला जन्म दिला. या बालिकेची जन्माची नोंदणी पुरूष म्हणून करण्यात आली. तसा अहवाल पालिकेत सादर केला.तर खामगाव तालुक्यातील कारेगाव हिंगणा येथील दुसऱ्या एका प्रकरणी ३ डिसेंबर २०१७ मध्ये जन्माला मुलगा आल्यानंतर चक्क मुलीची नोंद केली.
रुग्णालय प्रशासनाला पत्रचुकीचा जन्म नोंदणी पालिकेच्या जन्म नोंदणी उपनिबंधकांकडून सामान्य रूग्णालय प्रशासनाला पत्र देण्यात आले. मात्र, तरीही सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव गत आठवड्यात उघडकीस आले. नांदुरा तालुक्यातील अंबादास खवले यांच्या पत्नीने ८ नोव्हेंबर २०१८ रोजी एका मुलीस जन्म दिला. मात्र, सामान्य रुग्णालयाने जन्म नोंदणी अहवाल पाठविताना मुलगा म्हणून नोंद पाठविली.
बहुतांश वेळा चुकीचा जन्म नोंदणी अहवाल सादर करण्यात येतो. टेंभूर्णा आणि हिंगणा भोटा येथील प्रकरणात चुकीचा अहवाल सादर करण्यात आला. मात्र, रूग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देताच, सुधारीत अहवाल त्यांच्याकडून सादर करण्यात आला. त्यानंतर संबंधितांना सुधारीत जन्म प्रमाणपत्र देण्यात आले.- राजू मुळीकजन्म मृत्यू लिपिक, नगर परिषद, खामगाव.
मुलगी जन्माला आल्यानंतरही सामान्य रूग्णालयाने मुलगा जन्मल्याचा अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारे नगर पालिकेच्या जन्म निंबधकांनी जन्म प्रमाणपत्र दिले. मात्र, प्रत्यक्षात आपणास मुलगी झाली आहे. आता तिच्या जन्माचे प्रमाणपत्र मिळविताना चांगलीच हेळसांड होत आहे.- अंबादास खवलेमुलीचे वडील, रा. हिंगणा भोटा ता. नांदुरा.