हल्ली युवा वर्गामध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची मोठी क्रेझ असते. वाढदिवसाच्या काही दिवस आगोदर शुभेच्छांचे फलक उभारण्यासाठी वाढदिवसाच्या रात्री १२ वाजता फटाके फोडण्याचे नियोजन अनेक वेळा होते. तसेच वाढदिवसाचे फलक लावण्याचा उद्योग ही बिनबोभाटपणे केला जातो. तसेच रात्री १२ वाजता फटाके फोडून रस्त्यात केक कापण्याचे नवे फॅड ही सध्या जानेफळ येथे आले आहे. मात्र, यावर आता पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, कायद्याचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
बर्थडे भावाचा पण त्रास समद्या गावाला
रस्त्यावर वाहने उभी करून त्यावर केक कापायचा. केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करायचा. आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालायचा. मध्यरात्री फटाके फोडून जल्लोष करायचा. दारूच्या बाटल्या उडवायच्या असा प्रकार बऱ्याच वेळा पाहावयास मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो.
कायदा काय सांगतो?
रस्त्यावर वाढदिवस म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन त्यामुळे मुंबई पोलीस कायदा कलम ११० व ११२ नुसार हा गुन्हा ठरतो. यामुळे वाढदिवस साजरा करताना आनंद जरूर साजरा करा, परंतु कुठे धिंगाणा, मस्ती करून विनाकारण आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही याचेसुद्धा भान ठेवा.
जानेफळ किंवा पोलीस स्टेशन हद्दीत कोठेही रात्री दरम्यान असभ्य वर्तणूक करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
-राहुल गोंधे, ठाणेदार, जानेफळ पोलीस स्टेशन