बुलडाणा: टी १ सी १ वाघाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील आगमनाची वर्षपुर्ती होत असतााच अभयारण्यात रानगव्याच्या रुपाने एक नवीन पाहूणा आला असून देव्हारी बिटमध्ये सहा डिसेंबर रोजी तो निदर्शनास आला. ज्ञानगंगा अभयारण्यात रानगवा दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. रानगव्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील अस्तित्वामुळे येथील जैवविविधता अधिक समृद्ध असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर दरम्यान टिपेश्वर अभयारण्यातून १३०० किमी पेक्षा अधिकचा प्रवास करत ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झालेल्या टी १ सी १ वाघामुले ज्ञानगंगा अभयारण्य चर्चेत आले होते. आता त्याच्या आगमनाची वर्षपुर्ती झाली असतानाच रानगवा दिल्याने पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्य चर्चेत आले आहे.
रानगवा प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यालगतच्या मेळघाट परिसरात आढळतो. त्यामुळे मेळघाट परिसरातून हा रानगावा आलेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तो नेमका कोठून व कोणत्या मार्गाने ज्ञानगंगा अभयारण्यात आला याचा वन्यजीव विभागही आता शोध घेणार आहे. मात्र त्याचे ज्ञानगंगा अभयारण्यातील हे आगमन अभयारण्याच्या वनसंपदेच्या समृद्धतेवर शिक्का मोर्तब करणारे आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार आहे. सुमारे ७०० किलोपर्यंत रानगव्याचे वजन असते. हत्तीसह अन्य मोठ्या प्राण्यानंतर रानगवा वजनदार असतो. प्रसंगी तो कळपातही आढळतो. मात्र सध्या ज्ञानगंगा अभयारण्यात एकच रानगवा दिसून आलेला आहे. ज्ञानगंगा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) एम. डी. सुरवसे जंगलगस्तीवर असताना सायंकाळच्या सुमारास हा रानगवा त्यांच्या निदर्शनास पडला.