चिखली: तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील कार्यक्रमा दरम्यान नेत्यांच्या भाषणामधील वक्तव्यावरून काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. दरम्यान, उभय बाजूंचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता त्यांच्यात पुन्हा वाद होऊन पोलिस ठाण्यावर दगडफेक झाली. यात पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटीलसह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.दरम्यान पोलिसांनी प्रकरणी सौम्य लाठीमार करत पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या जमावाला पांगवले. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले व चिखलीचे काँग्रेसचे आ. राहूल बोंद्रे हे ही कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी विकास कामांच्या मुद्द्यावर उभय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोंधळ झाला. दरम्यान, तेथील प्रकरण निवळले असे वाटत असतानाच चिखली येथील महाबीज कार्यालयानजीक उभय बाजूंचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामनेयेऊन त्यांच्या शाब्दीक वाद झाला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले या कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाल्या. त्याचवेळी आमदार राहूल बोंद्रे व त्यांचे कार्यकर्तेही तक्रार देण्यासाठी तेथे आले. त्यामुळे उभय बाजू पुन्हा एकदा समोरा समोर आल्या. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्रीही झाली. त्यानंतर येथे दगडफेक झाली. त्यात पोलिस उपनिरीक्षकमोहन पाटीलसह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. परिस्थितीचे गांभिर्य पाहता पोलिसांनी जमलेल्या जमावर सौम्य लाठीमार करत हा जमाव पांगवला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिखली येथे दंगाकाबू पथक पाठवून पोलिसांची कुमूक वाढविण्यात आली. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचे गांभिर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील हे हीचिखलीत दाखल झाले आहेत. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी रात्री उशिरापर्र्यंत पोलिसात उभय बाजूकडून तक्रार दाखल झाली नव्हती.या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याच्याशी संपर्क साधला असता आपण चिखलीत दाखल झालो असून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत असल्याचे त्यांंनी स्पष्ट केले. दरम्यान, चिखली पोलिस ठाण्याच्या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. यासंदर्भात आ. राहूल बोंद्रे व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.