एकापेक्षा अधीक अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्याने तीन सभापतीपद रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेची राहिली. पाच विषय समितीच्या सभापतिपदापैकी चारच अर्ज दाखल झाले. त्यातही एकपेक्षा अधीक अर्जावर सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या असल्याने आजच्या विशेष बैठकीत केवळ दोनच विषय समितीच्या सभापतिपदाची निवड झाली आहे. यामध्ये पाणीपुरवठा सभापतिपदी गोपाल देव्हडे तर आरोग्य सभापतिपदी विजय नकवाल यांचा समावेश आहे.
चिखली पालिकेच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले असता महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी अर्जच दाखल झाला नाही. तर उर्वरीत चार विषय समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल झाले. मात्र, यातील तीन विषय समितीच्या सभापतीपदासाठी एकापेक्षा अधिक अर्जांवर सूचक, अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या असल्याने सर्व अर्ज बाद ठरविण्यात आले. दरम्यान भाजपाच्या गोपाल देव्हडे यांनी पाणीपुरवठा सभापतिपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक दीपक खरात व शे.शमीनबी शे.राजू यांच्या सूचक व अनुमोदक असल्याच्या स्वाक्षरीचा आणखी एक अर्ज दाखल केला होता. तो मंजूर झाल्याने गोपाल देव्हडे यांची काँग्रेसच्या पाठींब्याने पाणीपुरवठा सभापतीपदावर निवड झाली आहे. तर आरोग्य सभापतीपदासाठी विजय नकवाल यांनी सूचक म्हणून प्रा.डॉ.राजु गवई व अनुमोदक म्हणून मंगला झगडे यांच्या स्वाक्षरीचा दाखल अर्ज देखील मंजूर झाल्याने त्यांची आरोग्य सभापतीपदी निवड झाली आहे. दरम्यान बांधकाम, शिक्षण आणि महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद रिक्त राहिले. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा भूसंपादन अधिकारी भूषण अहीरे , मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, अर्जुनराव इंगळे, विनायक खरात, संदीप वजगडे, प्रदिप रूद्राक्ष, गणेश गवारे, धनंजय इंगळे यांनी काम पाहिले.
कॅप्शन : काँग्रेसचा पाठिंबा घेत सभापतिपदी निवडून आलेले गोपाल देव्हडे यांचा सत्कार करताना काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवक.