खामगाव, दि. १४- घाटाखालील सहापैकी चार पंचायत समित्यांवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले असून, एका पंचायत समितीवर भारिप-बहुजन महासंघाने झेंडा फडकविला आहे. दरम्यान, नांदुरा पंचायत समितीमध्ये भाजप-सेनेच्या मदतीने काँग्रेसचा सभापती विजयी झाला, तर उपसभापतीपदी शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. घाटाखालील सहाही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीवर २५ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. १४ सदस्य संख्या असलेल्या खामगाव पंचायत समितीमध्ये भाजपने १0 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे मंगळवारी भाजपच्या उर्मिला गायकी यांची सभापतीपदी तर भगवानसिंह सोळंके यांची उपसभापती निवड झाली, तर जळगाव जामोद पंचायत समितीवरही अपेक्षेप्रमाणे भाजपच्या गीताताई बंडल सभापती तर रामेश्वर राऊत उपसभापतीपदी विजयी झाले. त्याचप्रमाणे मलकापूर पंचायत समितीवर सभापतीपदी संगीता तायडे (पाटील) तर उपसभापतीपदी सीमा बगारे यांची अविरोध निवड करण्यात आली. संग्रामपूर पंचायत समितीवरदेखील ईश्वर चिठ्ठीचा कौलदेखील भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडला. समान मतांमुळे या ठिकाणी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये सभापतीपदी तुळसाबाई वाघ तर उपसभापती उज्ज्वला घायल यांना विजयी घोषित करण्यात आले. शेगाव पंचायत समिती भारिपच्या ताब्यातशेगाव पंचायत समितीमध्ये भारिप-बहुजन महासंघाने कॉंग्रेसला सोबत घेत निवडणूक लढली. यामध्ये सभापतीपदी विठ्ठल भास्करराव पाटील तर उपसभापतीपदी शालिनी सुखदेव सोनोने यांची निवड झाली. नांदुर्यात काँग्रेसचा सभापतीनांदुरा पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या अर्चनाताई शिवाजीराव पाटील यांनी भाजपा-शिवसेना सदस्यांच्या संख्याबळावर काँग्रेसच्या नीताताई भगवान धांडे यांचा पाच विरुद्ध तीन मतांनी पराभव केला, तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुनीताताई संतोष डिवरे यांची अविरोध निवड झाली.
घाटाखालील चार पंचायत समितींवर भाजपचा झेंडा
By admin | Published: March 15, 2017 1:48 AM