लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विदर्भ राज्याबाबत जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या विदर्भ आत्मबळ यात्रेच्या व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार व नेते मंडळी येत असली तरी भाजपचे आमदार त्यावर येत नाही. त्यामुळे त्यांना वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा मांडण्यासाठी आत्मबळ यावे, तथा विदर्भवादी असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्येही हे आत्मबळ यावे, असा टोला काटोलचे भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी बुलडाणा येथे लगावला. दरम्यान, प्रारंभीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसेल, असेही ते म्हणाले.स्थानिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदर्भ आत्मबळ यात्रेनिमित्त ते बुलडाण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे धनंजय देशमुख, जवाहर चरडे प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील ६२ मतदार संघ पालथे घातले असून, पहिल्या टप्प्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात ते जात असून, त्यानुषंगाने बुलडाणा येथे ते आले होते.वेगळ्य़ा विदर्भासंदर्भात जोवर राजकीय इच्छा शक्ती निर्माण होणार नाही, तोवर विदर्भ राज्य निर्मितीला बळ मिळणार नाही, असेही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत विदर्भातील ६६ मतदार संघांपैकी ४४ मतदार संघांमध्ये भाजपला नागरिकांनी कौल दिला होता. वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यासह दिलेल्या आश्वासनाची पूर्तता भाजपाने जर केली नाही तर आगामी निवडणुकांत याचे भाजपला दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. वेगळ्य़ा विदर्भासाठी राजकीय मतभेद विसरून तथा विविध सामाजिक, युवा, डॉक्टर, महिला, शेतकरी, तंत्रज्ञांच्या संघटनांनी एकत्र येऊन यासाठी लढा उभारावा, असे ते म्हणाले. सध्याचे सरकार हलेले ऐवढे संख्याबळ नक्कीच आहे, असे त्यांनी सांगितले.शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणार्या योजना सरकारने आणाव्यात, असे सांगून कृषी, महसूल विभागात शेतकर्यांप्रती संवेदनशीलता राहिली नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागासाठी विशेष तरतुदींची आज गरज आहे. भाजपाने निवडणुकीच्या वेळी आश्वासित केलेल्या योजना मार्गी लावल्यास गाडी रुळावर येण्यास मदत होईल. आश्वासने पूर्ण होत नसल्यामुळे जनमानसात रोष वाढत आहे, असे ते म्हणाले. सेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्दय़ावर त्यांना विचारणा केली असता, गले की हड्डी निघाली, असे माफक उत्तर त्यांनी दिले. पक्षशिस्तीच्या मुद्दय़ावर आपणांस पक्षाने बजावलेल्या नोटीसला आपण उत्तर दिले नाही. मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्राचे उत्तर अद्याप मिळाले नाही. त्यामुळे नोटीसला उत्तर देण्यात तूर्तास आपण बाध्य नाही, असेही ते म्हणाले.
पूर्ण होतील अशीच आश्वासने द्यावी!मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात रोजगार निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात विदर्भाच्या दृष्टीने विचार करता फक्त दहा हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात येणार होती. पैकी काहीच मिळाली नाही. आताही रोजगार निर्मितीबाबत त्यांनी आश्वासने दिली आहेत; पण साडेचार वर्षात जी ते पूर्ण करू शकले नाहीत. ते आता काय करणार, त्यामुळे पूर्ण होतील तेवढीच आश्वासने त्यांनी द्यावीत, असे सांगण्यासही आ. देशमुख विसरले नाहीत.