चिखली : रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी जीव गमावला आहे. पूरपरिस्थितीत अडकलेले हजारो लोक, मृत्यूच्या दाढेत प्राण कंठात घेऊन जगत असलेले आबालवृद्ध, डोळ्यांदेखत पुराने हिरावलेला संसार अशी विदारक स्थिती असल्याने पीडितांच्या मदतीसाठी हजारो मदतीचे हात पुढे आले आहेत. परंतु, अद्यापही काही भागात नागरिकांना मदत पोहोचली नाही म्हणून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखलीच्यावतीने मदत उभारण्यात येत असून यामध्ये सर्वांनी शक्य तितके योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
पुरामुळे उद्भवलेल्या विदारक स्थितीतून सावरण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, दानशूर आदी सर्वच क्षेत्रातून मदत केली जात आहे. असे असले तरी अद्यापही अनेक भागात नागरिकांना मदत पोहोचली नाही म्हणून भारतीय जनता पार्टी चिखली आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखलीच्यावतीने आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, चिपळूणपर्यंत मदतीचे पार्सल पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने विविध समाजमाध्यमे व पॉम्प्लेटद्वारे सर्वांनाच मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
‘मदतीचा हात देऊया.. चला त्यांना पुन्हा उभं करू या !’
वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरूण, पांघरूण देण्यासाठी समाजाकडे मदतीची हाक दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने चटई, चादर, पॅन्ट-शर्ट, महिला व लहान मुलांसाठीचे कपडे, अन्न, धान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान येत्या ६ ऑगस्टपर्यंत ही मदत गोळा केल्यानंतर ती पूरपीडितांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दानशूरांकडून संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्याकडून मिळणारी मदत, सामग्री आम्ही स्वत: आपल्याकडे येऊन जमा करून घेऊ, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, नगरसेवक अनुप महाजन, नामू गुरुदासानी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले आहे़
मदत देण्यासाठी यांच्याशी साधा संपर्क
मदत देण्यासाठी युवराज भुसारी, चेतन देशमुख, शार्दूल व्यवहारे, शंकर उदरकर, चैतन्य जोशी, शंकर देशमाने, आयुष्य कोठारी, यश भाला, पीयूष भीमेवाल, संदीप लोखंडे, अनिकेत सावजी, दत्ता खंडेलवाल, ऋषभ शर्मा, पीयूष अग्रवाल, अक्षय धुमाळ, विक्रांत महाजन, सचिन कोकाटे, मयूर गीते खंडाळा, कपिल झगडे, शुभम राजपूत, विजय वाळेकर, आकाश चुनवाले, अक्षय भालेराव, कैलास सपकाळ, नरेंद्र मोरवाल, यश टिपारे, शे.साबीर बाबू, हेमंत शिंगणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.