यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची एक चित्रफितच फिरत असून त्यात त्यांनी भाजपचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे जेष्ठ नेते चंद्राकांत पाटील यांच्यावर सडकू टीका केली आहे. ही टीका करताना आ. संजय गायकवाड यांची जीभही घसरली असल्याचे या चित्रफितीमधून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नका, लस देऊ नका, ऑक्सिजन देऊ नये या साठी भाजपतर्फे कंपन्यांवर दबाव आणला जात असल्याचा आ. गायकवाड यांनी आरोप केला आहे. त्यासंदर्भाने बोलताना कोरोना हा काही पक्ष बघून होत नाही. भाजपच्या १०५ आमदार व २० खासदारांनी महाराष्ट्राच्या जनतेने मतदान केले आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्याचे कामच भाजप करत आहे. आघाडी सरकारमधील मंत्री कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नियोजन करत आहे, अैाषधीसाठ्याची जुळवाजुळव करत आहे. त्यांची भाजपचे हे नेते खिल्ली उडवत आहे. कोरोनामुळे येत्या काळात मृत्यूचे तांडव महाराष्ट्रात झाल्यास काय होईल, असा प्रश्न उपस्थित करून भाजपच्या आमदार, खासदारांनी महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे. ते पुन्हा यांना उभे करतील का? असा प्रतिप्रश्नही आ. गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकारण न करता महाराष्ट्र आणि माणूस जगला पाहिजे याला प्राधान्य द्यावे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचे जंतू जर आपल्याला सापडले असते तर भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या तोंडात ते आपण टाकले असते, असे वादग्रस्त विधानही आ. संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे येत्या काळात आता बुलडाणा जिल्ह्यातही भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.