- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एकीकडे महाजनादेश आणि जनआशिर्वाद यात्रांचा राज्यात बोलबाला सुरू असतानाच भाजपने स्वबळावर १४ व्या विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्याचेचित्र आहे. त्यानुषंगाने भाजपेच पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे हे एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छूकांशी व्यक्तीगतस्तरावर चर्चा करणार आहेत. युतीसाठीच्या समांतर चर्चेसोबतच ही स्वबळाची चाचपणी असल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असून युती झाल्यास भाजप शिवसेनेच्या वाट्याचा बुलडाणा विधानसभा मतदार संघ आपल्याकडे खेचण्याच्या तयारीला लागला आहे. परिणामी बुलडाणा भाजप-शिवसेनेचा जिल्ह्यातील ४-३ असा जुना फॉर्म्युला आता प्रसंगी ५-२ होण्याची साधार शक्यता व्यक्त होत आहे. पक्ष निरीक्षक खा. अमर सबाळे हे बुलडाण्यात दाखल होताच तातडीने जिल्ह्यातील सात ही विधानसभा क्षेत्रातील जिल्हा पदाधिकारी, इच्छूक उमेदवार, कोअर कमेटी, मंडळ अध्यक्ष आणि भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यांचासमोर बुलडाणा विधानसभा मतदार संघ भाजपसाठी कसा महत्त्वाचा आहे. याचे तर्क मांडण्याची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेचे वरच्या फळीतील नेत्यांमध्ये युतीचे ‘नक्की ठरल्याच’ सांगत असून त्यासाठी लोकसभेत उभय पक्षांची झालेली युती आणि मिळालेले यश याचा हवाला दिल्या जात आहे. जागा वाटपावरून होणारी शाब्दीक ‘फेकाफेक’ प्रत्यक्षात युती बाबत साशंकता निर्माण करत आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यातही भाजपने आता जिल्ह्यातील सातही विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्यांची पक्ष निरीक्षकामार्फत भेट घेऊन स्वबळाची तयारीच चालवली असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
बुलडाणा विधानसभेसाठी आग्रहजिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेला बुलडाणा विधानसभा मतदारसंघ भाजपला हवा आहे. त्यादृष्टीने भाजपकडून काही तर्कही दिल्या जात आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा प्रारंभी भाजपकडे होता. मात्र १९९६ मध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासाठी आग्रहास्तव बुलडाणा लोकसभा शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. त्यापूर्वी जनसंघाच्या काळापासून बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा भाजपकडे होता. १९८९ मध्ये भाजकडून येथे सुखदेव नंदाजी काळे हे खासदार होते. १९९१ मध्ये पी. जी. गवई यांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे मुळचा भाजपा असलेला लोकसभा मतदार संघ हा १९९६ मध्ये आग्रहाखातर शिवसेनेला सोडला होता. आता या बदल्यात बुलडाणा विधानसभा मतदार संघ हा भाजपला हवा आहे, असा तर्क भाजपच्या गोटातून दिला जात आहे. २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवाराने येथे तब्बल ३३ हजार २३७ मते घेतली होती तर शिवसेनेचा उमेदवार हा बुलडाण्यात चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेला होता. सोबतच चिखली आणि सिंदखेड राजा येथेही भाजपच्या उमेदवाराला ४७ हजार ५२० आणि ४५ हजार ३४९ अशी दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. या पृष्ठभूमीवर जागा वाटपाचा दावा केला जात आहे.
भाजपचे पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे हे एक सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छूकांशी चर्चा करणार आहे. बुलडाणा लोकसभेच्या जागेच्या बदल्यात बुलडाणा विधानसभा मतदार संघ भाजपला मिळावा, यासाठी प्रयत्नरत आहोत. जिल्हा परिषदेसह, पाच पंचायत समित्या, सहा पालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद पूर्वीपासून अधिक राहली आहे.-धृपदराव सावळे,जिल्हाध्यक्ष भाजप