चिखली : लॉकडाऊन काळामध्ये वाढीव वीज बिले देऊन ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकण्यासह आघाडी सरकारने वीज बिले माफ करण्याचे आश्वासन देऊनही आता सक्तीची वसुली सुरू केली असल्याचा आरोप करीत याविरोधात भाजपाच्या वतीने ५ फेब्रुवारी रोजी वीज वितरण कंपनीला ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
चिखली भाजपाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय वीज वितरण कंपनी साकेगाव रोड येथे सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, वीज बिलांबाबत केलेल्या आंदोलनामुळे वाढीव वीज बिले माफ करण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यानी दिले होते; परंतु आघाडी सरकारच्या म्होरक्यांनी घूमजाव करत वाढीव बिले माफ करण्याऐवजी सक्तीच्या वसुलीचे आदेश देऊन विद्युत ग्राहकांची लूट चालविली असल्याने महावितरणच्या या जुलमी व सक्तीच्या वसुलीच्या विरोधात भाजपाच्या वतीने मंडळ स्थरावरील महावितरण केंद्रावर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. चिखली भाजपाच्या वतीने या आंदोलनात नगराध्यक्ष, सभापती, उपनगराध्यक्ष, उपसभापती, जि.प., पं.स., नगरसेवक, तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन महावीज वितरण कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले आहे.