- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : भारतीय जैन संघटना (बीजेएस) व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मेळ साधून बुलडाणा जिल्ह्यात ‘सुजलाम् सुफलाम्’ अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले, त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्याचा बीजेएस पॅटर्न राज्यातील चार जिल्ह्यांत राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुषंगाने उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात नियोजन कार्यशाळा नुकत्याच घेण्यात आल्या असून, सप्टेंबर अखेर लातूरमध्ये अभियानाचे उद्घाटन होत आहे.दुष्काळावर मात करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबविली. धरणातील गाळ उपसा करून धरणाची पाणी पातळी वाढविणे आणि तोच गाळ शेतात टाकल्यानंतर शेताची सुपीकता वाढविणे, असे कार्य या अभियानातून करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना समृद्ध करण्याचे मोठे काम या अभियानातून सफल झाले. जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना व प्रशासकीय अधिकारी यांनी राबविलेला पॅटर्न उस्मानाबाद, लातूर, अकोला व वाशिममध्ये राबविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. आता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात २३ व २४ आॅगस्ट रोजी मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा घेऊन अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आले.लातूरमध्ये ३० सप्टेंबरचा साधणार मुहूर्त!लातूर जिल्ह्यासाठी ३० सप्टेंबरचा अभियान राबविण्याच्या दृष्टीने मुहूर्त ठरविण्यात आला आहे. कारण १९९३ मध्ये याच दिवशी किल्लारी भूकंपाचा प्रलय घडून आला होता. त्यामुळे हा दिवस लातूर जिल्हावासीयांसाठी दुर्दैवी दिवस म्हणून स्मरणात आहे; मात्र दुष्काळ मुक्तीसाठीच्या एका शुभ उपक्रमाचा या दिवशी प्रारंभ करून जुन्या दु:खद आठवणी विस्मरणात टाकण्याची या मागे भूमिका आहे.पुढील आठवड्यात अकोला, वाशिमबुलडाण्याच्या पथकाकडून पुढील आठवड्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल. अकोला येथे ७ सप्टेंबर व वाशिम येथे ८ सप्टेंबर रोजी कार्यशाळा होणार असून, दोन्ही ठिकाणी मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवलेही उपस्थित राहणार आहेत.