मोताळा (जि. बुलडाणा): : मोताळा-नांदुरा मार्गावरील सबस्टेशननजिक सायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात काळी-पिवळीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना सोमवारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात काळी-पिवळी सायकलस्वारास धडक देऊन रस्त्यालगतच्या खडड्य़ात कोसळली. जीवितहानी झाली नसली तरी सायकलस्वारासह काळी-पिवळीमधील पाच प्रवासी जखमी झाले. जखमींना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. चिंचपूर येथील संदीप मापारी हे ४ जुलै रोजी काळी-पिवळी (एम.एच.२८ एच.३३२२) मध्ये प्रवासी घेऊन १२ वाजेच्या सुमारास नांदुर्याकडे जात होते. मोताळा सबस्टेशनजवळ अचानक काळी-पिवळीसमोर सायकलस्वार आल्याने, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले व काळी-पिवळी सायकलस्वारास धडक देऊन रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात सायकलस्वार सै. इमरान सै. इसहाक (वय १४) रा. मोताळा व काळी-पिवळीमधील संगीता रमाकांत उचाडे (वय ४0) रा. उमरा, कलावती मुरलीधर डामरे (वय ६२) रा. नायगाव, प्रवीण प्रल्हाद जाधव (वय १७) रा. फर्दापूर व चालक संदीप मापारी हे पाच जण जखमी झाले. अपघातात सायकलस्वार सै. इमरान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी जखमींना ताबडतोब स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी डॉ. जैस्वाल व डॉ.जोशी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. घटनास्थळी बोराखेडी पोलीस पाहणी करताना आढळून आले. मात्र वृत्त लिहिपर्यंंत पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद झाली नव्हती.
काळी-पिवळी उलटून पाच जखमी
By admin | Published: July 05, 2016 1:04 AM