लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी बेलगाव येथे जात असताना बेलगाव येथील महामार्गात जमिनी जाणार्या शेतकर्यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा समृद्धी महामार्ग रद्द करावा, यासाठी रस्त्यात उभे राहून घोषणाबाजी करीत गाडीतून जाणार्या कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.२२ ऑक्टोबरला भाजप किसान आघाडीच्या वतीने बेलगाव येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १.३0 वाजताच्या दरम्यान भाऊसाहेब फुंडकर यांचा ताफा बेलगाव येथे जात असताना महामार्गात जमिनी जणारे शेतकरी रितेश वानखेडे, परशराम वानखेडे, दत्तात्रय वानखेडे, महेश बाजड, ज्ञानेश्वर वानखेडे, गोपाल वानखेडे यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा महामार्ग रद्द करावा, आम्ही महामार्गासाठी जमिनी देणार नाही अशी घोषणाबाजी करीत कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. या अगोदरही याच शेतकर्यांनी महामार्गासाठी जमिनी देणार नाही, म्हणून रक्ताभिषेक करून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची पूजा केली होती. सोबतच आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघर्ष चालूच ठेवू, असे भ्रमणध्वनीवरून शेतकर्यांनी सांगितले होते, तर बेलगाव येथे महामार्गात २४ शेतकर्यांची जवळपास ८0 एकर जमीन जात असून, या शेतकर्यांना सदर जमिनीचा योग्य मोबदला शासनाकडून मिळत नसल्याने शेतकर्यांनी निषेध व्यक्त केला.
कृषी मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:11 AM