- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकरी नसतानाही किंवा गरजेपेक्षा जास्त युरिया खरेदी केलेल्या पहिल्या २० खरेदीदाराची चौकशी करण्याच्या आदेशानुसार राबवलेल्या मोहिमेत बुलडाणा जिल्ह्यातील दोषी आढळलेल्या ९ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर एकाला नोटिस बजावण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कारवाईचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांना सादर केला आहे.अनुदानीत युरिया खताचा काळाबाजार रोखणे तसेच त्याचा उद्योगामध्ये वापर करण्यासाठी अनुदानीत किमतीत खरेदी करण्याचा प्रकार राज्यात सर्वत्र घडतो. त्याला आळा घालण्यासाठी निमकोटेड युरियाचा पर्याय असताना चालू वर्षात त्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे उपलब्ध युरिया केवळ शेतकऱ्यांना तेही जमिनीच्या प्रमाणानुसारच वाटप व्हावा, याची खबरदारी कृषी आयुक्तालयाने घेतली. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाºयांना ही तपासणी मोहिम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये खरिप हंगामात एप्रिल ते जुलै २०२० या काळात युरियाची जास्त खरेदी केलेल्या पहिल्या २० खरेदीदाराची तपासणी करण्याचे बजावण्यात आले. तालुका स्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांच्या पथकावर ही जबाबदारी होती. त्या पथकांनी या काळातील युरिया खरेदी-विक्रीच्या नोंदी तपासल्या. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २० कृषी सेवा केंद्रातून काही व्यक्तींना जादा युरिया खरेदी केल्याचे पुढे आले. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलंबित करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी नरेंद्र नाईक यांनी दिला. जिल्ह्यातील ९ केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. तर एक कृषी केंद्र संचालकाला नोटिस बजावण्यात आली आहे. याप्रकरणात काहींनी कृषी सहसंचालकांकडे धाव घेतली आहे. त्याठिकाणी पुढील सुनावणी होत आहे.पहिल्या २० खरेदीदारांनी जादा युरिया खरेदी केल्याच्या माहितीनुसार पडताळणी झाली. तपासणी पथकांच्या अहवालानुसार दोषी आढळलेल्या कृषी केंद्रांवर कारवाई केली. अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.
- नरेंद्र नाईक, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा