लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नेहमीच्या त्रासाला कंटाळून लहान भावाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना शहरानजीकच्या घाटपुरी येथील विठोबानगर परिसरात १४ मे रोजी संध्याकाळी घडली. या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी मृतकाच्या मोठ्या भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.शहरानजीकच्या घाटपुरी येथील विठोबानगरात सदाशिव ठोसरे यांचे कुटुंब राहत असून, त्यांना दोन मुले आहेत. यापैकी लहान मुलगा युवराज सदाशिव ठोसरे (वय २३) हा नेहमी घरात वाद करून कुटुंबीयांना त्रास देत असे. याच कारणावरुन १४ मे रोजी वाद झाला. या वादातून युवराज ठोसरे याचा मोठा भाऊ किरण सदाशिव ठोसरे याने युवराज ठोसरे याचेवर नेहमीच्या त्रासाला कंटाळून चाकूने वार केले. यामध्ये युवराज ठोसरे हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत युवराज ठोसरे यास उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता तो मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले, सहायक पोलीस निरीक्षक लवंगडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी मृतकाचे वडील सदाशिव लहानू ठोसरे (वय ५२) रा.विठोबा नगर घाटपुरी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी किरण सदाशिव ठोसरे (वय २९) रा. विठोबानगर याच्याविरुध्द कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लवंगडे हे करीत आहेत.
नेहमीच्या त्रासाला कंटाळून भावाचा खून
By admin | Published: May 15, 2017 12:39 AM