लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : पावसाने दडी मारल्यामुळे भरोसा येथील महिलांनी हिंदू धर्मग्रंथानुसार जल, वायू आणि अग्नी या तिन्ही शक्तींचा अधिपती असलेल्या देवांचा राजा इंद्राचा धावा सुरू केला आहे. येथील महिलांनी पावसासाठी ८ जुलै रोजी गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये इंद्रदेवाची स्थापना करून, सात दिवस अखंड हरीजप सुरू केला आहे.जिल्ह्यात पावसाने उघाड दिल्याने शेतातील उभी पिके वाळायला लागली आहेत, तर काही जागी पेरण्या उलटल्या आहेत. अनेकांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीची भीती व्यक्त केली जात आहे. बळीराजाला या संकटातून सोडवण्यासाठी भरोसा येथील महिलांनी देवाचा राजा इंद्राची आराधना सुरू केली आहे. ८ जुलै रोजी मातीच्या इंद्राच्या मूर्तीची गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढून महादेवाच्या मंदिरामध्ये स्थापना करून, सात दिवसांच्या अखंड हरिनाम जपाला सुरुवात केली आहे. यामध्ये गावातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला आहे. पावसासाठी येथील महिलांकडून देवेंद्राची स्थापना करून सात दिवस हरिनाम जप करण्याची २० वर्षांपासूनची परंपरा असून, हरिनाम जप सुरू झाल्यानंतर पाऊस येतो, अशी येथील महिलांची धारणा आहे.
पावसासाठी इंद्रदेवाला साकडे!
By admin | Published: July 10, 2017 1:08 AM