सुधीर चेके पाटील/चिखलीसध्या राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात बुलडाणा जिल्हय़ातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून या दुष्काळात होरपळत असून, दुष्काळाच्या या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. चालू वर्षात एकूण १५ तर या आठवड्यात जिल्हय़ात दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे विदारक चित्र आहे. शिवाय दुष्काळासोबतच तीव्र पाणीटंचाईची छळ प्रत्येकाला सोसावी लागत आहे. याचा विपरीत परिणाम यंदाच्या लग्न सोहळ्यावरही झाला आहे. लागोपाठ तिसर्यांदा आलेल्या या दुष्काळाने वधूपित्यांच्या जीवाला घोर लावला आहे. त्यामुळे उपवर मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ह्यनेमेचि येतो दुष्काळह्ण या उक्तीनुसार दुष्काळ पाचविलाच पुजलेला आहे. अतवृष्टी, गारपीट, अत्यल्प पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या तीन वर्षांंपासून शेतकरी दुष्काळाच्या दाहकतेत होरपळ आहे. निसर्गाच्या अवकृपेने सलग तिसर्या वर्षी शेतीचे नियोजन कोलमडल्याने एकूण अर्थचक्र बिघडले आहे. खरिपातील नगदी पीक सोयाबीन जिथे सरासरी १0 क्विंटल व्हावयास हवे होते ते २ क्विंटलवर येऊन ठेपल्याने मार्केटमध्येही आवक अत्यंत कमी झाली असून, मार्केट यार्डात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. दरवर्षी या दिवसात शेतकर्यांच्या हातात खरिपात उत्पादित शेतमालाचा पैसा पडतो. त्या पैशांच्या भरवशावर अर्थचक्र फिरत असते; मात्र यावर्षी शेतकर्यांच्या हाती पैसा नसल्याने हे अर्थचक्र फिरणे थांबले आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या बाजारपेठा व व्यवसायाला बसला आहे. याच काळात गावागावात उपवर मुला-मुलींचे लग्न ठरतात. कुणाच्या लग्नाची बोलणी होते, कुणाची सुपारी फुटते, तर कुणाच्या लग्नाची शिदोरी गावात येते. सारखपुडा, कुंकू-टिळ्याचे कार्यक्रम होतात.लग्नाच्या तारखा निघतात; मात्र यावर्षी शेतकर्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे लग्न सोहळ्यांनाही ह्यब्रेकह्ण लागला आहे. सद्य:परिस्थितीत दरवर्षी रब्बीचा हंगाम बहरलेला असतो; मात्र यावर्षी रब्बी हंगामातील हरभरा, तूर, गहू या पिकांना मध्यंतरी झालेला पाऊस व त्यानंतर आलेल्या थंडीच्या लाटेचा फटका बसला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातून हाती पैसा येईल याची शाश्वती नाही. या वर्षी रब्बी हंगामावर अवलंबून राहिल्यास फेब्रुवारीनंतर तीव्र पाणीटंचाईची छळ सोसावी लागणार असल्याने विशेषत: शेतकरी आपल्या मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ आली असल्याची माहिती अनेक शेतकर्यांनी दिली आहे.
दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधूपिता
By admin | Published: December 29, 2014 12:08 AM