बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. लसीकरणानंतर तत्काळ रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या ८३ बॅगा रक्तसाठा उपलब्ध आहे. इतरही रक्तपेढ्यांमध्ये मर्यादितच साठा असल्याने रक्तपेढ्या ऑक्सिजनवर असल्याचे चित्र आहे.
विविध आजारांच्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते. यामध्ये सिकलसेल, थॅलेसीमीया व इतर आजाराच्या रुग्णांसह अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या लसीकरणामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वेगाने घटत आहे. यामुळे या आजाराच्या रुग्णांना सध्या रक्त उपलब्ध होत आहे. मात्र येत्या काही दिवसांत रक्ताचा खूप मोठा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपरोक्त आजाराच्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांची प्रकृती गंभीर बनू शकते. यामुळे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तपेढ्यांमधील सध्याच्या रक्तसाठ्याचा विचार करता, एखादा मोठा अपघात झाल्यास हा रक्तसाठा एकाचदिवशी संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसाधारणपणे सात ते आठ दिवस पुरेल एवढा रक्तसाठा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शासकीय रक्तपेढीत चार दिवसांचाच साठा
येथील शासकीय रक्तपेढीत आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतर रक्तदानासाठी येणाऱ्या रुग्णांना रक्त चढविल्याशिवाय परतण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी ही चिंतेची बाब आहे. याकरिता युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
लसीकरणाआधी करा रक्तदान
कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. याबाबत माहिती असलेले रक्तदाते लसीकरणापूर्वी रक्तदान करत आहेत. मात्र ही बाब सर्वांनाच माहीत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. यामुळे लसीकरण करण्यापूर्वी नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राऊत यांनी केले आहे.
कोरोना काळातील रक्तसंकलनाची स्थिती
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीला महिन्याला १८० बॅगा रक्तसाठा लागतो. सर्वसाधारणपणे रक्त उपलब्ध करून देताना संबंधित रुग्णाकडून डोनर घेण्यात येतो. यामुळे रक्तसाठा मर्यादित असला, तरी यामध्ये काही प्रमाणात वाढ होत पुढील गरज भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात.
कोरोनामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. यासोबतच दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे एप्रिल, मे व जून महिन्यात रक्ताचा तुटवडा भासतो. मात्र काही सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने नियमित गरज असलेल्या रुग्णांच्या रक्ताची गरज भागविण्यात मदत होते. काही रक्तदाते स्वत:हून रक्तदानासाठी पुढाकार घेत असल्याने शक्यतो अडचण निर्माण होत नाही.
सध्या अतिशय कमी रक्तसाठा उपलब्ध आहे. यामुळे वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. संभाव्य धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी नियमित रक्तदान करणाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. या माध्यमातून रक्त उपलब्ध झाल्यास अडचण दूर होण्यास मदत होऊ शकते.
............................