बुलढाणा : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतकांचे मृतदेह चार रुग्ण वाहिकांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे.
या मृतदेहावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तसेच ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीही करण्यात येणार आहे़ त्यासाठी अकोल्यावरून डीएनए तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. बसमधील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने मृतकांची ओळख पटवणे अवघड काम झाले आहेत. यासंदर्भात डीएनए टेस्टच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस झाली. त्यात प्राथमिक अंदाजानुसार २१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ही बस काही काळ कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यु झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.