मोताळा व मलकापूर या अवर्षण प्रवण तालुक्यांसाठी ही योजना महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने आ. गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेत योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. या योजनेची सुधारित किंमत ३,७६४ कोटी रुपयांची असून, आतापर्यंत योजनेवर ५५० कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. योजनेचा पाणीवापर हा जवळपास ७.५० टीएमसी राहील. बोदवड उपसा सिंचन योजनेचा पाण्याचा स्रोत हातणूर धरण राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पंपहाउस, २५०० एमएम व्यासाच्या दोन उर्ध्वनलिका असून त्यांची लांबी १२ किमी राहणार आहे. २४८५ हॉर्सपॉवरचे ८ व २२०० हॉर्सपॉवरचे ८ असा एकूण १६ पंपांद्वारे जुनाेने येथे साठवण तलाव निर्माण करून नलिकेद्वारे शेतखर यांच्या शेततळ्यामध्ये पाणी साठविण्यात येणार आहे. त्यातून सौरऊर्जेद्वारे पंपाच्या साहाय्याने शेतास पाणी देण्यात येईल.
योजनेचे पहिल्या टप्प्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
--या गावांना होईल लाभ--
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील महाळुंगी, वडगाव (महाळुंगी), पिंपळगाव देवी, कोल्ही गोलर, लिहा बु., सिरमिळ, टाकळी बु., वडगाव जमालपूर, माकोडी, टेंभी, सावरगाव, उऱ्हा, माळेगाव, आव्हा व निपाने ही १६ गावे तर मलकापूर तालुक्यातील दुधलगाव, लोनवडी, शिराढोन, मोरखेड खु., हरणखेड, वडजी, चिंचलहेडा बु., आळंद, जांभुळदाभा, गोलखेड, गोरडा, खडकी, देवदाभा, खामखेड, मालेगाव, विवरा, दसरखेड, गनवाडी, रानगाव, शिवनी, कुंड, तिग्रा, पिंपळ खुटा या २३ गावांतील शेतीला त्याचा लाभ होईल. या भागातील ४२ हजार ४२० हेक्टर सिंचनाखाली येईल.
--रविवारी घेतला आढावा--
या योजनेंतर्गत सुमारे ३७ टक्के क्षेत्र हे बुलडाणा जिल्ह्यातील आहे. त्या अनुषंगाने आ. गायकवाड, आ. राजेश एकडे यांनी २१ मार्च रोजी अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील आणि कार्यकारी अभियंता महजान यांनी जळगाव खान्देश येथे बैठक घेत प्रकल्पाची व त्यातील अडचणींची माहिती घेतली. सोबतच मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांसोबत यासंदर्भाने बैठक निश्चित करणार असल्याचे आ. गायकवाड यांनी सांगितले.