खामगाव: लोखंडी खांब अंगावर पडून १५ वर्षीय बालक जागीच ठार झाला. ही घटना आज १९ जुलै रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वे मालधक्क्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. स्थानिक सतीफैल भागात राहणारा विक्की सुखदेव नाटेकर (वय १५) हा शहरातील श्री अ.खि. नॅशनल हायस्कूलमध्ये वर्ग ९ मध्ये शिकतो. आज सकाळची शाळा आटोपून वडील इंदोरला गेले असल्याने तो रेल्वे मालधक्क्यानजीक राहणारा मोठा भाऊ शालिग्राम नाटेकर याच्याकडे आला होता. त्यानंतर तो वीजपुरवठा बंद असलेल्या मालधक्क्यावरील तुटलेल्या लोखंडी खांबाजवळ खेळत असताना त्याच्या डोक्यावर लोखंडी पथदिव्याचा खांब तुटून पडला. त्यामुळे विक्की जागीच गतप्राण झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाला दोन बहिणी असून, तो एकुलता एक मुलगा असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तुटलेला खांब काढून न घेता पाईप लावून जोडण्यात आला होता. सदर खांब काढण्यासाठी निष्काळजीपणा झाल्याने सदर विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, असा आरोप मृतकाच्या नातेवाइकांनी केला. तसेच रेल्वेकडून मदतीची मागणी केली आहे.
विजेचा खांब अंगावर पडून बालक ठार
By admin | Published: July 20, 2014 1:07 AM