रंगनाथ खेडकर (५३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ३१ मे रोजी पीक विम्याची कागदपत्रे हवी आहेत, अशा आशयाचा फोन त्यांना कृषी कार्यालयातून फोन आल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार कागदपत्रे व आधारकार्ड घेऊन रंगनाथ खेडकर हे पांग्री उगले फाट्यानजीक गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नव्हते. त्यामुळे गबाजी खेडकर यांनी याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान रंगनाथ खेडकर यांची दुचाकीही (एमएच-२८-एएम-३२२१) प्रांग्री उगले फाट्यापासून आतमध्ये एक किमी अंतरावर मिळाली होती. तपासात ज्या मोबाईवरून फोन करण्यात आला होता तोही चोरीचा असल्याचे समोर आले होते.
दरम्यान, ३ जून रोजी पेनटाकळी धरणात रंगनाथ खेडकर यांचा मृतदेह तरंगताना आढळला. यासंदर्भात पेनसावंगी येथील महिला गीता शेजोळ यांनी अमडापूर पोलिसांत तक्रार दिली होती. खून करण्याच्या उद्देशाने हात-पाय बांधून पोटाला दगड बांधून एकाचा मृतदेह धरणात टाकला होता, अशी तक्रार या महिलेने दिली होती नंतर पोलीस तपासात मृतदेह रंगनाथ खेडकर यांचा असल्याचे समोर आले होते. प्रकरणी अमडापूर पोलिसात रंगनाथ खेडकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करत आहेत.