खामगाव : स्थानिक तलाव रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयानजीकच्या ४४ वर्षीय बेपत्ता इसमाचा मृतदेह गुरुवारी दुपारी जनुना तलावात आढळून आला. गत दोन दिवसांपासून हा इसम घरून बेपत्ता होता. सुनील महादेव चव्हाण असे मृतक इसमाचे नाव आहे.
सविस्तर असे की, तलाव रोडवरील सुनिल महादेव चव्हाण २६ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजेपासून बेपत्ता झाले होते. नातेवाइकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, कुठेही मिळून न आल्यामुळे शहर पोलिसांत त्यांच्या पत्नी नंदा सुनील चव्हाण यांनी पती हरविल्याची तक्रारही नोंदविली होती.
दरम्यान, गत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या इसमाचा मृतदेह गुरुवारी दुपारी जनुना तलावात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी इसमाचा मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पुढील तपास मोहन करूटले करीत आहेत.