सिंदखेडराजा(जि. बुलडाणा) : तालुक्यातील कोनाटी येथे शौचालय बांधकामात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, एकाच शौचालयाचे फोटो दोन- दोन ठिकाणी लावून बोगस अनुदान लाटल्याची तक्रार परमेश्वर खंदारे, जालींदर खंदारे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे २८ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. या तक्रारीत नमूद आहे की, कोनाटी येथे ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १७२ लाभार्थ्यांची यादी बेसलाइन सर्व्हेनुसार तयार करण्यात आली होती. त्यापैकी आजपर्यंत ४९ शौचालयाचे बांधकाम केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. त्यातील काही शौचालय अनेक वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. त्यानंतर मार्च १६ पर्यंत १४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे १४ शौचालयांचे अनुदान काढण्यात आले. वास्तविक जुनेच शौचालयाचे फोटो काढून आजी व नातवाच्या नावावर, दीर व भावजयच्या नावावर तर काही सधन शेतकर्यांच्या नावावर अनुदानाचे वाटप ग्राम पंचायतने केले. याच गावामध्ये हिंमत खंदारे, कडूजी खंदारे, दशरथ खंदारे व माणीक रायभान आदी नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम केले. ग्रामपंचायतचे सचिव त्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यास तयार नसून, ते अनुदानापासून वंचित आहेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी परमेश्वर खंदारे, जालींदर खंदारे यांनी २८ जून रोजी निवेदनाद्वारे केली.
बोगस लाभार्थ्यांना वाटले अनुदान
By admin | Published: July 01, 2016 12:30 AM