नांदुरा (जि. बुलडाणा) : चाकूच्या धाकावर एका व्यक्तीला रेल्वे गेटजवळून रेल्वे मोरीच्या खाली नेऊन साहित्य व रोख रक्कम लुटणार्या दोघांना २७ मार्च रोजी रात्री पोलिसांनी अटक केली आणि लुटीतील ऐवज जप्त केला. तालुक्यातील नारखेड येथील सुरेश फुंडकर हे २६ मार्चला रात्री ७ वाजताच्या सुमारास त्यांच्याकडील कामगार दिलीप महादेव सोळंके याच्याजवळ लग्नाचा आहेर, भांडी, कापड, मोबाइल व कूलरची मोटर असे साहित्य दिले आणि त्यास रेल्वे गेटजवळ थांबवून गावात आणखी साहित्य आणण्यासाठी गेले होते. ही संधी साधून आदित्य शत्रुघ्न उंबरकर (१९) व उमेश गणेश चिमकर (दोघेही रा. वॉर्ड नं. १४, आंबेडकरनगर, नांदुरा) यांनी दिलीप महादेव सोळंके याच्या पाठीला चाकू लावला व जिवे मारण्याची धमकी देत, त्यास सर्व साहित्यासह दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्याला दुचाकीवर बसवून भुईशिंगा रोडवरील रेल्वे मोरीच्या पुलाखाली नेऊन त्याच्याजवळील लग्नाचा अहेर, भांडी, रोख रक्कम, मोबाइल हिसकला आणि त्याला तेथेच सोडून दोघे साहित्य घेऊन दुचाकीने पसार झाले. सदर घटनेची माहिती त्याच दिवशी नांदुरा पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवीत नांदुरा येथून दोघांना पकडून त्यांची ओळखपरेड घेतली. तक्रारदाराने साहित्य लुटून नेणारे भामटे ओळखले. पोलिसांनी ह्यबाजीरावह्ण दाखविताच त्यांनीही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेला माल जप्त केला. याप्रकरणी दिलीप महादेव सोळंके यांच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कांढुरे, गोलाईत, पवार, कश्यप हे करीत आहेत.
चाकूच्या धाकावर लुटणा-या दोघांना अटक
By admin | Published: March 28, 2016 2:05 AM