लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आपल्या आईच्या कुशीत झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीला उचलून नेवून तिच्यावर सामुहिकरित्या पाशवी बलात्कार करणाºया चिखली येथील दोघांना बुलडाणा विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. बुलडाणा न्यायालयात जवळपास ५५ वर्षानंतर एखाद्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले. भारतीय दंड संहितेच्या ३७६ डीबी कलमातंर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात ११ आॅगस्ट रोजी बुलडाणा विशेष न्यायालयाने आरोपी सागर विश्वनाथ बोरकर व निखील शिवाजी गोलाईत यांना दोषी ठरवले होते तर प्रत्यक्षात १३ आॅगस्ट रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चिखली येथील एक नऊ वर्षीय मुलगी ही आई-वडीलांसोबत झोपलेली असताना आरोपी सागर विश्वनाथ बोरकर व निखिल शिवाजी गोलाईत यांनी २७ एप्रिल २०१९ रोजी तिचे एका दुचाकीवरून अपहरण केले होते. सोबतच चिखलीमधील स्मशानभूमी समोरील मोकळ््या जागेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. दरम्यान, गंभीर अवस्थेतील या चिमुकलीवर प्रथम चिखली व नंतर बुलडाणा येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथे घाटी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पुर्ण बरी झाल्यानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ व त्यानंतरचा तपास एसडीपीओ बी. बी. महामुनी यांनी केला. या प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ व त्यानंतरचा तपास उपविभागीय पोलस अधिकारी बाबुराव महामुनी यांनी केला. प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर तपास करून बुलडाणा विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण १५ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. त्यात पीडितेचे वडील, तपास अधिकारी, डॉक्टर, नायब तहसीलदार यांच्यासह पीडित मुलीचीही साक्ष झाली होती. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत लक्ष्मण भटकर, अतिरीक्त सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी बाजु मांडली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकूण विशेष न्यायाधिश चित्रा एम. हंकारे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात लावण्यात आलेल्या अन्य काही कलमानुसारही आरोपींना आर्थिक दंड व दोन वर्षाच्या कैदेचीही शिक्षा झाली आहे. एका गंभीर प्रकरणात शिक्षा सुनावण्यात येत असल्याने जिल्हा न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
कलम ३७६ डीबी अंतर्गत आरोपींना शिक्षा
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणात पोक्सो कायद्यातंर्गतचे कलम सहा समाविष्ट करण्यात आले होते. पण केंद्र सरकारने भारतीय दंड संहितेच्या ३७६ कलमामध्ये १२ वर्षाखालील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असेल तर ३७६ डीबी हे कलम दुरुस्तीन्वये २०१८ साली समाविष्ट केले आहे. त्यात फाशीची तरतूद आहे. पोक्सोतंर्गतचे सेक्शन सहा हा बालकांशी संबंधीत असला तरी त्यातील दुरुस्ती ही चिखलीतील घटना घडल्यानंतर झाली आहे. त्यामुळे भारतीय दंड संहितेतील ३७६ डीबी कलमातंर्गत देण्यात येणारी कॅपीटल पनीशमेंट या प्रकरणात बुलडाणा विशेष न्यायालयाने दिली असल्याचे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सोनाली सावजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.