अंढेरा(बुलढाणा) : पश्चिम बंगालमधील युवतीची गळा आवळून हत्या करून पळून गेलेल्या दाेन आराेपींना २४ तासातच जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पाेलिसांच्या पथकाला यश आले. धावत्या रेल्वेतच पाेलिसांच्या पथकाने वसई रेल्वे स्थानकावर १४ ऑक्टाेबर राेजी रात्री १२ ते एकच्या दरम्यान आराेपींना अटक केली.
पश्चिम बंगाल येथील अंजली उर्फ मिस्टी ही रजत उर्फ राहुल व छोटु या.पश्चिम बंगाल यांच्याबराेबर अंढेरा पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या चंदनपूर येथे साेयाबीन साेंगणीसाठी आले हाेते. दरम्यान रजत व राहुल यांनी अंजली हीचा दाेरीने गळा आवळून खून केला़ तसेच घटनास्थळावरुन दाेघांनीही पाेबारा केला़ घटनेची माहिती मिळताच अंढेरा पाेलिसांनी धाव घेवून पंचनामा केला. या प्रकरणी भागवत अनंता इंगळे रा.चंदनपुर यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी दाेन्ही युवकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दाेन्ही आराेपींची पूर्ण नावे माहित नसल्यामुळे आराेपींना अटक करणे आव्हानात्मक हाेते. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पेालिसांची दाेन पथके आराेपींच्या शाेधासाठी रवाना करण्यात आली हाेती. या पथकांनी सायबर पाेलिसांच्या मदतीने वसई रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतच दाेन्ही आराेपींना अटक केली. अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अंढेरा पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सिध्दार्थ सोनकांबळे व हेड कॉन्स्टेबल भरत पोफळे आणि बुलढाणा एलसीबी पथकाचे निलेश सोळंके व इतरांचा सहभाग हाेता.