बुलडाणा : कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सभेतील निर्णय बेकायदेशीररीत्या फिरवून तळणी येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा अट्टहास राज्याचे कृषी व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे करीत आहेत. हा अट्टहास संशोधन, उपलब्ध सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय बुलडाणा येथे सुरू होईपर्यंंत पाठपुरावा करण्यात येणार असून, यासाठी लवकरच कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सहकार भारतीचे सतीश गुप्त यांनी देऊन शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.स्थानिक पत्रकार भवनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शासनाने मंजूर केलेले कृषी महाविद्यालय बुलडाणा येथे व्हावे, या मागणीसाठी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी सहकार भारतीचे सतीश गुप्त, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे, अँड.अशोक सावजी, धर्मवीर संघटनेचे संदीप गायकवाड, अँड.जितेंद्र लाहोटी, शेतकरी, शेतमजूर संघटनेचे लखन गाडेकर, सुनील सपकाळ, अँड. जयसिंग देशमुख, शशांक पंधाडे, बाळासाहेब चौधरी, बी.आर.पाटील, श्रीराम हिंगे, श्रीराम कुटे, रमेश लोखंडे आदींची उपस्थिती होती. सतीश गुप्त म्हणाले की, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या कार्यकारी परिषदेने ८ जानेवारी रोजीच्या सभेमध्ये बुलडाणा मुख्यालयी कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा ठराव घेतला आहे; परंतु महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे यांनी त्यांचे मूळ गाव तळणी येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तळणी येथे कृषी विद्यापीठाच्या मालकीची जमीन नसताना ते विद्यापीठाच्या अधिकार्यांवर दबाव आणत आहेत. हा अन्याय असून, विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला आहे. वास्तविक शेती संशोधनासाठी बुलडाण्याचे वातावरण पुरक असून, येथे कृषी केंद्राची मोठय़ा प्रमाणात जागा आहे. त्यामुळे आजही कृषी महाविद्यालय सुरू केल्यास सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतात; तसेच कृषी महाविद्यालयील विद्यार्थ्यांना संधोधनाच्या, रहिवासीच्या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतात. याबाबत मुख्यमंत्र्यासह पालकमंत्री विविध मान्यवरांना निवेदने पाठविण्यात आली आहेत; मात्र त्या निवेदनाचे कोणीच उत्तर दिले नाही. त्यामुळे बुलडाण्याला कृषी महाविद्यालय सुरू होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, तर आभार सुनील सपकाळ यांनी मानले.
तळणीचा अट्टहास अन्यायकारक - गुप्त
By admin | Published: April 06, 2016 12:20 AM