साखरखेर्डा: पोहत असताना पाण्यात बुडणाऱ्या मित्रांना वाचविण्यास गेलेल्या एका १२ वर्षीय चिमुकल्याचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना येथील महालक्ष्मी तलावावर घडली. मृत्यूचा हा थरार मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान जवळपास अर्धा तास चालला, तर अन्य तिघांना वाचविण्यात गुराख्यांना यश आले.येथील गणेश लक्ष्मण डुकरे (१२), साहिल भानुदास माळकर (१२), कृष्णा प्रकाश डुकरे (११), विशाल गजानन डुकरे (१३) ही मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होती. मंगळवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येऊन चौघांनी जेवण केले. चौघांचेही आई-वडील मोलमजुरीसाठी बाहेर गेलेले होते. जेवण आटोपल्यानंतर चारही मुले महालक्ष्मी तलावावर गेली. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे त्यातील तिघांनी तलावात उड्या मारल्या; परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडायला लागले; मित्र पाण्यात बुडत असताना गणेश डुकरे या मुलाने त्यांना वाचविण्यासाठी तलावात उडी मारली; परंतु आपल्याला पोहता येत नाही, याची कल्पना त्याला नव्हती. तो सरळ गाळात गेला. १५ ते २० फूट गाळ आणि पाणी असल्याने तो वर आला नाही. ही बाब काही गुराखी मुलांच्या लक्षात येताच, त्यांनी साहील माळकर, कृष्णा डुकरे, विशाल डुकरे या तिघांना वाचविले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी दवाखान्यात पाठविले; परंतु गणेश डुकरे याचा गाळात फसून मृत्यू झाला. साखरखेर्डा येथून सावंगी भगत येथे जाणाऱ्या एका वाटसरूने तलावात उडी घेऊन खोलवर गाळात फसलेल्या गणेशला अर्ध्या तासानंतर बाहेर काढले. मृत गणेश डुकरे याच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. कोवळ्या मुलाचाही तलावात बुडून करून अंत झाल्याने डुकरे परिवारावर मोठे संकट ओढवले आहे. (वार्ताहर)
तलावातील गाळात फसून चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 3:03 PM