शेगाव : नवबौद्ध जातीच्या विकास योजतेतून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समितीमधील शाखा अभियंता पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड (वय ५७) रा. सुटाळा खु. खामगाव याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी पंचायत समितीमध्येच अटक केली. एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात लाच मागणाऱ्यांविरोधात ही कारवाई केली आहे.लाच द्यायची नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली तसेच तक्रार दिली. त्यामध्ये सन २०१९-२० मध्ये सांगवा गट ग्रामपंचायतअंतर्गत एकफळ येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजनेंतर्गत हायमास्ट लाईट लावण्याचे काम घेण्यात आले. ते काम २०२० मध्ये पूर्ण झाले आहे. त्या कामाचे देयक १ लाख ४३ हजार ७०० रुपये आहे. ते अदा करण्यासाठी ५ टक्के म्हणून ७,५०० रुपये लाचेची मागणी शाखा अभियंता गायकवाड याने केली. तडजोडीअंती ७,००० रुपये रुपये स्वीकारले. लाचलुचपत पथकाने खामगाव येथील सुटाळा खुर्द येथील रहिवासी पुरुषोत्तम गायकवाड याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी, विजय मेहेत्रे, चालक अरशद शेख यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. सोमवारी लोणार तालुक्यात लाच प्रकरणी तलाठ्याविरोधात कारवाई झाल्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे.
सात हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:38 AM