बुलडाणा : नैसर्गिक संकटामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे मदत मिळावी, यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात विमा काढतात. दरम्यान, याबाबत विमा कंपन्यांच्या अटी, शर्ती असल्यामुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. या सर्व विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक लागणार असून, आता कृषी आयुक्तालयाकडून सुचविलेल्या सहा पर्यायांद्वारे शेतकरी विमा कंपन्यांना नुकसानीबाबत पूर्वसूचना देऊ शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नुकसानाच्या प्रस्तावासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत पूर्वसूचना मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करून संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसल्यामुळे, तसेच नेटवर्क, सर्व्हर डाऊन अशा विविध समस्यांमुळे शेतकरी नुकसानाची पूर्वसूचना देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींना आता ब्रेक लागणार आहे.
४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दि. ६, ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने ११८ गावांमधील ३ हजार ६९९ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच जुलै महिन्यातही जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले होते.या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे़
हे आहेत पर्याय
क्रॉप इन्शुरन्स ॲप
विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक
विमा कंपनीचा ई-मेल
विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय
कृषी विभागाचे मंडळ कृषी कार्यालय
ज्या बँकेत विमा जमा केला, ती बँक शाखा
आधी हे होते दोन पर्याय
ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. ते शेतकरी संबंधित विमा कंपन्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून नुकसानाची सूचना देत होते. मात्र, भ्रमणध्वनीवर अनेक शेतकऱ्यांचा संपर्कच होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंद होत नव्हती.
मोबाईल ॲपद्वारे नुकसानीबाबत माहिती सादर करून, तसेच त्या ॲपमध्ये नुकसानीचे फोटो अपलोड करून माहिती सादर करण्यात येत होती.
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
नुकसान झाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना माहिती विमा कंपनीपर्यंत पाेहाेचवता येत नसल्याने मदत मिळत नव्हती़ आता कृषी विभागाने शेतकऱ्यांना सहा पर्याय उपलब्ध केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही़ ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांनी या पर्यायांचा वापर करून नुकसानीची माहिती द्यावी,असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.