खामगाव (जि. बुलडाणा), दि. २५- गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाचे आगमन झाले असून, कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडणे सुरू आहे. नेमके याचवेळी पावसामुळे उडीद भिजून नुकसान होऊ नये, याकरिता शेतकर्यांनी उडिदाची सोंगणी करून ढीग लावले आहेत. यावर्षी तालुक्यात पाच हजार हेक्टरवर उडिदाचा पेरा झाला असून, अधूनमधून पावसामुळे उडीद काढणीला ब्रेक लागला आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस समाधानकारक राहिला. पेरणीनंतर पीक बहारात येत असताना पावसाने दडी मारली. एक महिन्याच्या जवळपास पावसाने तोंड दाखविले नाही. यामुळे शेतकर्यांच्या हाताशी आलेले खरीप पीक हातचे निघून जाईल काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यानच्या काळात मुगाचे पीक निघून आले. मुगानंतर उडीद काढणीचा हंगाम सुरु झाला. उडीद सोंगणी सुरु असतानाच परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे उडिदाच्या पिकाचे पावसाने भिजून नुकसानाची शक्यता बळावली आहे. गतवर्षी उडिदाला १२ हजारांच्या जवळपास प्रतिक्विंटल भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकर्यांनी उडिदाचा पेरा वाढवला आहे. खामगाव तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर उडिदाचा पेरा झाला आहे. परतीचा पाऊस कमी-जास्त प्रमाणात सुरु असल्याने उडिदाची काढणी कशी करायची, या विवंचनेत शेतकरी अडकले आहेत. शेतकर्यांनी सोंगणी करुन उडिदाचे ढीग लावले आहेत. ताडपत्रीचा आधार घेऊन पावसापासून उडिदाचे संरक्षण केले जात आहे. उडिदाचे पीक ताडपत्रीमध्ये झाकून ठेवल्यास गरमीमुळे उडीद खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. पावसाने उघाड दिल्यास उडीद पीक काढणीला पुन्हा जोर येणार आहे.बाजारात उडिदाला साडेसात हजारांचा भावशेतकर्यांचे नगदी पीक म्हणून मूग, उडिदाची ओळख आहे. उडीद काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकरी काढलेल्या उडीद बाजारात विक्रीस आणत आहे. बाजारात उडिदाला प्रतिक्विंटल साडेसात हजारांचा भाव मिळत आहे. गतवर्षी उडिदाचे भाव १२ हजारांच्या जवळपास पोहचले होते. त्यामुळे शेतकर्यांनी यावर्षी उडिदाची पेरणी वाढवली होती. बाजारात उडिदाचे भाव वाढणार आहेत.
परतीच्या पावसामुळे उडीद काढणीला ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2016 2:45 AM