नागपूर ते औरंगाबाद महामार्गावरील सुलतानपूर ते जालना दरम्यान रोडवर डांबरीकरणाचे काम सुरू होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे दुरुस्ती व ८४ किलोमीटर अंतराच्या दरम्यान डांबरीकरणाचे दोन लियर टाकण्याचे काम शेट्टी कंपनीकडे देण्यात आले होते. २४ जून च्या सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सुलतानपूर पासून डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. याच वेळी सुलतानपूर, भानापूर, अंजनी या भागात जोरदार पाऊस झाला. पावसामध्ये डांबरीकरणाचे काम व्यवस्थित होत नाही, तरीदेखील संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून डांबरीकरणाचे काम भर पावसामध्ये सुरू असल्यामुळे रस्त्याला डांबरीकरण चिटकत नव्हते. होणारे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसत होते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पती दिलीप वाघ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली. दरम्यान, होणारे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवले. ७ जूनपासून विदर्भामध्ये मृग नक्षत्राच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शासनानेच सात जून नंतर डांबरीकरण करण्यास बंदी घातलेली असतानादेखील नागपूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर सुलतानपूर ते जालना या दरम्यान भरपावसात व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होत असलेले ८४ कोटी रुपयाचे निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदार थातूरमातूर पूर्ण करण्याच्या तयारीत होते. या निकृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामाला दिलीप वाघ यांच्या तक्रारीनंतर ब्रेक लावण्यात आला.
काय म्हणतात प्रकल्प अधिकारी
जालना मार्गाचे काम पावसाळ्यात केल्यास काही दिवसातच पुन्हा ते डांबर उखडण्याची भीती आहे. त्यामुळे हे काम थांबणे आवश्यक होते. या महामार्गाचे काम पावसामध्ये होणार नाही, तर ऊन पडल्यानंतरच करण्यात येईल अशी माहिती औरंगाबाद येथील प्रकल्प अधिकारी कसबे यांनी भ्रमणध्वनीवरून दिली.