संदीप वानखडे
बुलडाणा : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लाेकांना स्वयंपाकाचा माेफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत गॅस कनेक्शन माेफत मिळत असले तरी सिलिंडर महागल्याने सर्वसामांन्याना परवडत नसल्याचे चित्र आहे. सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.
स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असून, यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागत आहे. आधीच महागाई वाढत असल्याने त्यात गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. सध्या सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत असून, सबसिडी बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
गत काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावेत.
मीना विजय खरात, गृहिणी
सिलिंडरचे भाव ९०० रुपयांपर्यंत पाेहोचले आहेत. दुसरीकडे सबसिडी मात्र तीन ते चार रुपये मिळत आहे, त्यामुळे, केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावेत, तसेच सबसिडी वाढविण्याची गरज आहे.
साेनाली वैभव मगर, गृहिणी
काेराेनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियाेजन बिघडले आहे. गॅसचे भावही दुपटीने वाढले असून, मिळणारी सबसिडी बंदच झाली आहे. त्यामुळे, सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे. साेनू गणेश जुनघरे, गृहिणी
अत्यल्प मिळते सबसिडी
गॅस सिलिंडरवर आधी २०० ते २५० रुपये सबसिडी मिळत हाेती. त्यामुळे, गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्यात हाेता. मात्र, आता सिलिंडरचे दर वाढलेले असताना केवळ २ ते ३ रुपये खात्यात जमा हाेत आहेत. या सबसिडीसाठी ग्राहकांना बँकेेचे खाते काढावे लागत आहे. त्यासाठी बँकेत काही रक्कम डिपाॅझिट ठेवावी लागते. त्यामुळे, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.