मेहकर, भोसा : तालुक्यात एकूण ९८ ग्रामपंचायती असून, यापैकी ४१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराला जात प्रमाणपत्र, कोटवार बुकाची नक्कल यासह अनेक कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे मेहकर तहसील कार्यालयातून काढून घेण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असताना मेहकर तहसीलमध्ये नक्कल विभागासह अनेक विभागांत दलालांचा सुळसुळाट वाढला आहे.
एक कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ४० रुपये लागतात. परंतु येथे ५०० ते ७०० रुपये मोजावे लागतात. निवडणूक विभागामध्ये दलालांचे प्रमाण वाढले असून, याकडे तहसीलदारांसह सर्वच अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अधिकारीही दलालांनी आणलेली कामे त्वरित करून देतात. यामध्ये सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. त्यांना विनाकारण आर्थि́क भुर्दंड सहन करावा लागत आहे. मेहकर तहसील कार्यालयाला ग्रामपंचायत निवडणुकीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेच नियम पाळले जात नाहीत. कोणाच्याही तोंंडाला मास्क बांधलेला नाही. संबंधित नक्कल विभागात सक्रिय असलेल्या दलालांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
तहसील कार्यालयामध्ये कोणत्याही विभागात पैशाची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीने माझ्याकडे लेखी तक्रार करावी.
- संजय गरकळ, तहसीलदार मेहकर.