नांदुरा (जि. बुलडाणा): तालुक्यातील येरळी जवळील पूर्णानदीच्या पुलाजवळून गेलेली बिएसएनएलची ओएफसी केबल पुर्णानदीला पूर आल्यानंतर वारंवार नादुरुस्त होत असल्याने त्याचा फटका बिएसएनएल च्या जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात बसतो. त्यामुळे ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा, मोबाईल व बँकींग प्रणाली ठप्प होते. यावेळेसही ४ ऑगस्टच्या रात्री आलेल्या महापुरामुळे ८ ऑगस्टपर्यंत सर्व सेवा ठप्प होत्या. पूर ओसरल्यानंतर ८ ऑगस्टला पुर्णाच्या पुलाजवळील ओएफसी केबलची दुरुस्ती कर्मचार्यांनी केल्यानंतर बिएसएनएल च्या सर्व सेवा पुर्ववत झाल्या. इंटरनेट सेवा पुरविणार्या बिएसएनएलची ओएफसी केबल ही पुर्णानदीच्या पुलावरुन गेली आहे. पुलाच्या उजव्या बाजुला सदर केबल बांधुन नदीपात्रातून नेण्यात आली आहे. पुर्णानदीला पुर आला व पुराचे पाणी पुलावरुन वाहू लागले की प्रामुख्याने ही केबल नादुरुस्त होते. मागील सप्ताहात ४ ऑगस्टच्या रात्री पुर्णानदीला पूर आल्याने ही ओएफसी केबल नादुरुस्त झाली. त्यामुळे सतत चार दिवस इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. त्याचा मोठा फटका राष्ट्रीयकृत बॅकांना बसला व त्यांचे व्यवहार ठप्प झाले. याबाबत अनेकांनी संबधीत अधिकार्यांसोबत संपर्क साधला असता केबल नादुरुस्त झाल्याचे सांगण्यात आले. पुर्णानदीचा पूर ओसरल्यानंतर ८ ऑगस्टच्या दुपारी पुर्णानदीच्या पुलाजवळील भागात बि.एस.एन.एल.च्या कर्मचार्यांनी नादुरुस्त केबलची दुरुस्ती केली. त्यानंतर सर्व सेवा पूर्ववत झाल्या. सदर प्रकार नेहमीच घडतो. त्यामुळे नविन पुलाच्या साह्याने केबल लावण्याची व्यवस्था कंपनीने केली तर या सर्व प्रकारातून बिचार्या ग्राहकांची सुटका होईल असे मत जानकारांचे आहे.
पूर्णेच्या पुरामुळे बीएसएनएलची सेवा ठप्प
By admin | Published: August 11, 2015 12:04 AM