बुलढाणा - परिसरात ३१ मार्च रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने जिजामाता माध्यमिक विद्यालयाची टीनपत्रे उडाली. गारपीट झाल्याने कांद्यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. टीनपत्रे पडल्याने अनेक जनावरे जखमी झाली आहेत.
३१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास चिंचपूर, पिंप्री कोरडे, फत्तेपूर परीसरात वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. त्यामुळे कांदा, गहू, हरभरा व संत्रा पिकाचे नुकसान झाले. येथील विलासराव मुगूटराव देशमुख यांनी त्यांच्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे दोन एकरातील कांदा पीक संपूर्णपणे जमीनदोस्त झाले. सोसाट्याचा वार्यामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे, जनावरांच्या गोठ्यांवरील टीनशेड, हॉटेल, शाळा, महाविद्यालयावरील टीनशेड उडाले. उडालेली टीनपत्रे अंगावर पडल्याने जनावरे जखमी झाली आहेत. शेतातील रस्त्यावर व चिंचपूर ते उदयनगर रस्त्यावर बाभळीचे व लिंबाची झाडे पडली. येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.