- हर्षनंदन वाघबुलडाणा : केंद्र शासनाने बजेट कमी केल्यामुळे ग्रामीण भागातील कुपोषणमुक्तीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पश्चिम वऱ्हाडातील ४ हजार १३० अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. अनेक अंगणवाड्यांना पोषण आहार वेळेवर मिळत नसून, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे त्यांना कुटुंबीयांचा खर्च चालविणे कठीण झाले आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांना आरोग्यविषयक माहिती देऊन सुविधा उपलब्ध करून देणे, बाळ जन्माला आल्यानंतर त्यास पोषण आहार पुरविणे आदी कामे केली जातात. आज रोजी पश्चिम वऱ्हाडात ४ हजार १३० अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीचे काम सुरू आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील १ हजार २७२, बुलडाणा जिल्ह्यातील १ हजार ८८५ व वाशिम जिल्ह्यातील ९७३ अंगणवाड्यांचा समावेश आहे; मात्र अंगणवाडीसाठी दरवर्षी बजेट कमी होत असल्यामुळे अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. केंद्र शासनाच्यावतीने अंगणवाड्यांसाठी २०१३-१४ पर्यंत १८ हजार कोटींचे बजेट मंजूर केले होते; मात्र त्यानंतर बजेटमध्ये ४० टक्के कपात करण्यात आली. सध्या नऊ हजार कोटींपर्यंतचे बजेट मंजूर करण्यात येत आहे. याशिवाय कुपोषण व आरोग्यविषयक विविध योजनांचे बजेट कमी झाले आहे.संपूर्ण कुपोषणमुक्तीसाठी बजेट वाढवून अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषण दूर करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने अंगणवाडीसाठी बजेट वाढवून द्यावे.- पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव, सिटू संघटना, बुलडाणा.