लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरात निर्माण होणारा बांधकामाचा मलबा व इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता रस्त्यावर , गटारीत, अथवा नाल्यात नेवून टाकल्या जात आहे. परिणामी, रहदारीस अडथळा निर्माण होण्यासोबतच नाल्या तुंबत असल्याने सर्वसामान्य नागरिक वेठीस धरल्या जाताहेत. मात्र, याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
बांधकामाचा मलबा, साहित्य तसेच इतर कचरा रहदारीच्या रस्त्यावर, गटारीत अथवा नालीत टाकल्यास २ हजार रूपये दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा नगर परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. मात्र, त्याअनुषंगाने कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. शिवाय रस्त्यावर कचरा आणि मलबा टाकणाºयांविरोधातही कोणतीही कारवाई केली जात नाही. परिणामी, सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
अशी आहे दंडात्मक तरतूद!
बांधकामाचा कुठल्याही प्रकारचा मलबा (वेस्टेज) व इतर विध्वंसक कचरा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर अथवा गटारीत टाकल्यास संबंधित नागरीक, कंत्राटदार, बिल्डर यांच्यावर २०१६ च्या अधिसुचनेनुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये किमान ५०० रूपये दंड व कमाल २ हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील काही नागरीक व कंत्राटदार बांधकामाचा मलबा कुठेही नेवून टाकतात. यामुळे अस्वच्छतेबरोबरच रहदारीस अडथळा निर्माण होतो. शहरातील मुख्यरस्त्यासोबतच गल्लीबोळीत ठिकठिकाणी बांधकाम साहित्य आणि मलबा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच शंकर नगर आणि यशोधरा नगरातील रस्त्यावर बांधकाम साहित्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अर्थातच कचरा आणि मलबा टाकणाºयांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे ही कारवाई थंडबस्त्यात आहे.
पालिकेत तक्रार दाखल करा!
शहरात कुणीही याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरात कुठेही कुणीही अशाप्रकारे बांधकाम मलबा टाकत असेल त्यासंबंधी पालिकेच्या आरोग्य विभागात तक्रारी करण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले आहे.